Travel became more expensive : महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक महत्वाची आणि खिशाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. आज, 1 एप्रिलपासून राज्यातील विविध महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील टोल दरात वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे प्रवास अधिक महाग होणार असून सर्वसामान्य वाहनधारकांना याचा थेट फटका बसणार आहे. राज्यातील सुमारे 70 टोल नाक्यांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि 35 प्रमुख टोल नाक्यांवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
सरासरी 3 ते 5 टक्क्यांनी टोल दर वाढवण्यात आले असून कार, जीप, बस आणि ट्रक अशा प्रकारच्या वाहनांसाठी नवीन दर लागू झाले आहेत. याशिवाय, टोल वसुलीच्या पद्धतीमध्ये देखील मोठा बदल करण्यात आला आहे. टोल नाक्यांवर आता रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्यात आले असून केवळ फास्टटॅग किंवा डिजिटल पेमेन्टवरच टोल भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेसवे, सोलापूर-पुणे महामार्ग यांसारख्या प्रमुख मार्गांवर हे नियम कठोरपणे लागू करण्यात आले आहेत.
एसआयटी अशोक खरातच्या घरात; भोंदूची पत्नी निसटली, पण मुलगा हाती लागला…
महागाईच्या पार्श्वभूमीवर टोल दरातील ही वाढ सामान्य नागरिकांसाठी अधिक आर्थिक ताण निर्माण करणारी ठरत आहे. त्यामुळे प्रवासाचा खर्च वाढणार असून वाहनधारकांनी अधिक नियोजन करूनच प्रवास करणे गरजेचे झाले आहे. दरम्यान, वाहनधारकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपल्या वाहनावरील फास्टटॅग अॅक्टिव्ह आहे का, त्यामध्ये पुरेसा बॅलन्स आहे का, हे तपासणे गरजेचे आहे. कारण बॅलन्स नसल्यास दंड आकाराला जाऊ शकतो.
तसेच टोल नाक्यांवर आता क्युआर कोड स्कॅन करून युपीआयद्वारे देखील टोल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे, वेळ आणि पैसे वाचवण्यासाठी वाहनधारकांनी फास्टटॅग किंवा डिजिटल पेमेन्टचा पर्याय तयार ठेवणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
