मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी आणि सपा अशी नवी आघाडी; सत्तास्थापनेत 6 नगरसेवक ठरू शकतात निर्णायक

मुंबईत दोन्ही राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक आणि समाजवादी पक्षाचे 2 नगरसेवक मिळून 6 सदस्यांची स्वतंत्र आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू.

Untitled Design (291)

Untitled Design (291)

Two NCPs and SP to form new alliance in Mumbai Municipal Corporation : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विशेषतः मुंबई महापालिकेच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत अनेक पारंपरिक राजकीय गणितं कोलमडली असून काही नवी समीकरणं आकार घेत असल्याचं चित्र आहे. ठाकरे गटासोबत निवडणूक लढवलेली शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, निकालानंतर मात्र अजित पवार गटाच्या अधिक जवळ जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत परस्परांविरोधात लढलेल्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस गटांमध्ये आता समन्वयाची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक, शरद पवार गटाचा एक नगरसेवक आणि समाजवादी पक्षाचे दोन नगरसेवक मिळून सहा सदस्यांची स्वतंत्र आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत.

ही आघाडी प्रत्यक्षात आली, तर या गटाला स्थायी समितीत एक, सुधार समितीत एक आणि शिक्षण समितीत एक सदस्यत्व मिळू शकते. यासोबतच इतर लहान समित्यांमध्येही प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. भविष्यात एखाद्या महत्त्वाच्या विषयावर मतदानाची वेळ आली, तर हे सहा नगरसेवक एकत्रित भूमिका घेतील, अशीही चर्चा आहे. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात दोन राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, महापौरपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडील दोन एसटी प्रवर्गातील नगरसेवक चर्चेत आले आहेत. सत्ताधारी गटांकडून या नगरसेवकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. प्रियदर्शिनी ठाकरे आणि जितेंद्र वळवी हे दोन्ही नगरसेवक एसटी प्रवर्गातून निवडून आले असून ठाकरे गटाकडून त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं जात आहे.

अहिल्यानगर महापालिकेत भाजपकडून धनगर समाजातील शारदा ढवण यांची गटनेतेपदी निवड

मुंबई महापालिकेतील महापौरपदाचं आरक्षण जर जुन्या चक्राकार पद्धतीनुसार ठरलं, तर एसटी प्रवर्गासाठी महापौरपद राखीव राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र, नगरसेवकांच्या आरक्षणासाठी ज्या नव्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता, त्याच धर्तीवर महापौरपदाचं आरक्षण नव्याने निश्चित केलं जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे यावेळी आरक्षणाच्या नव्या चक्राची सुरुवात मानली जाणार आहे. विशेष म्हणजे, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागांमध्ये केवळ ठाकरे गटालाच यश मिळालं आहे. प्रभाग क्रमांक 53 आणि 121 हे दोन्ही प्रभाग एसटी प्रवर्गासाठी राखीव होते. या दोन्ही ठिकाणी सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवार दिले होते. मात्र, प्रभाग 53 मधून जितेंद्र वळवी यांनी शिंदे गटाचे उमेदवार अशोक खांडवे यांचा पराभव केला, तर प्रभाग 121 मधून प्रियदर्शिनी ठाकरे यांनी शिंदे गटाच्या प्रतिमा खोपडे यांच्यावर विजय मिळवला.

दरम्यान, राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढली जाणार आहे. त्या दिवशी सकाळी 11 वाजता मंत्रालयात नगरविकास विभागाच्या माध्यमातून ही सोडत पार पडणार असून, कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाचा महापौर असेल, हे स्पष्ट होणार आहे. मुंबई महापालिकेच्या अंतिम निकालावर नजर टाकली, तर भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला 65 जागा मिळाल्या असून, शिंदे गटाच्या शिवसेनेने 29 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला 24, एमआयएमला 8, मनसेला 6 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 3, समाजवादी पक्षाला 2, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला 1 जागा मिळाली आहे. एकूण 227 नगरसेवकांचा सभागृहात समावेश आहे.

मुंबई महापालिकेतील पुढील सत्ता-समीकरणे, महापौरपदाचा प्रवर्ग आणि संभाव्य आघाड्या याबाबतची उत्सुकता आता 22 जानेवारीकडे लागली आहे.

Exit mobile version