Two serious accidents on the same day in Rahuri city : देशभरात 77 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर–मनमाड महामार्गावर आज (ता. 26) दुःखद घटना घडल्या. महामार्गाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे, रस्त्यावर पसरलेली खडी आणि अवजड वाहतुकीच्या बेफिकीर हालचालींमुळे एकाच दिवशी दोन भीषण अपघात झाले. यात एका तरुण विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत.
गाडगे आश्रम शाळेसमोर काळाचा घाला
गोटुंबा आखाडा (ता. राहुरी) येथील संकेत सखाराम बाचकर (वय 18) हा बी.एस्सी. ॲग्रीचे शिक्षण घेत होता. तो आणि त्याचा मित्र श्रीकांत काशिनाथ हापसे (वय 21) हे दोघे राहुरी कॉलेज येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमाहून दुचाकीवरून घरी परतत होते. नगर-मनमाड महामार्गावरील गाडगे आश्रम शाळेसमोर रस्त्याचे काम सुरू असून, ठिकठिकाणी खडी टाकण्यात आली आहे. याच खडीवरून वाहने वाचवण्याच्या प्रयत्नात अवजड वाहनचालक धोकादायक पद्धतीने वाहन चालवत असल्याचे चित्र आहे. सकाळी पाठीमागून आलेल्या ट्रकने संकेतच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेत संकेत ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर श्रीकांत हापसे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. मयत संकेत हा शांत व प्रेमळ स्वभावाचा तरुण होता. त्याचे वडील स्कूल बसवर चालक म्हणून काम करतात. एकुलत्या मुलाच्या अपघाती निधनाने बाचकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बस स्थानकासमोर दुसरा अपघात
पहिल्या घटनेची चर्चा सुरू असतानाच काही मिनिटांतच राहुरी बस स्थानकासमोर दुसरा अपघात घडला. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरून कानडगाव येथील प्रसाद शरद गागरे (वय 18) आणि सार्थक कैलास आहेर (वय 19) हे दोघे आयशर टेम्पोच्या धडकेत सापडले. या अपघातात प्रसाद गागरे याचा हाताचा पंजा पूर्णपणे ठेचला गेला असून पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. सार्थक आहेर याला किरकोळ दुखापत झाली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वनविभागाला सुमारे 8 कोटी 26 लाख रुपयांची हायटेक रेस्क्यू सामग्री
प्रशासनावर गंभीर आरोप
या दोन्ही अपघातांसाठी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रकल्प संचालक आणि संबंधित भारत कन्स्ट्रक्शन कंपनी जबाबदार असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. रस्ता दुरुस्ती कृती समितीने वारंवार मागणी करूनही या महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आलेली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून कामाचा वेग अत्यंत संथ असून, कोणतेही सुरक्षा नियम न पाळता रस्त्यावर खडी टाकली जात असल्याने दुचाकीस्वार थेट मृत्यूच्या दाढेत ढकलले जात असल्याचा आरोप होत आहे.
आंदोलनाचा इशारा
प्रजासत्ताक दिनीच एका निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेल्याने आणि तिघे युवक जखमी झाल्याने राहुरी परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अवजड वाहतूक बंद करावी आणि रस्त्याच्या कामात सुरक्षेचे नियम पाळावेत, अन्यथा येत्या काळात मोठे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी व कृती समितीने दिला आहे.
