विरोधकांनंतर आता सत्ताधाऱ्यांचाच सवाल; उदयनराजेंनी लाडकी बहीण योजनेवर व्यक्त केली चिंता

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Untitled Design 96 1

Untitled Design 96 1

Udayanraje expressed concern over Ladki Bhaini scheme : राज्यातील महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. विरोधकांकडून सातत्याने या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण वाढत असल्याचा आरोप केला जात असतानाच, आता सत्ताधारी पक्षातीलच एका वरिष्ठ नेत्याने याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

साताऱ्यात आयोजित बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा ताण पडत असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. सरकारने योजना सुरू केली, पण त्यामुळे तिजोरीवर मोठा भार आला आहे. विविध विकासकामांसाठी जितका निधी मिळायला हवा, तितका सध्या मिळत नाही. त्यामुळे उपलब्ध निधीतून विकासकामांचे नियोजन कसे करायचे आणि पुढचा मार्ग कसा काढायचा, यासाठी ही बैठक घेण्यात आली, असे उदयनराजेंनी म्हटले.

ब्रेकिंग : अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणावेळी हँड ग्रेनाईडचा स्फोट; 4 जण जखमी

या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कारण आतापर्यंत विरोधकच या योजनेवरून सरकारला लक्ष्य करत होते. मात्र आता महायुतीतीलच एका प्रभावी नेत्याने आर्थिक ताणाचा मुद्दा उपस्थित केल्याने सरकारची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रविवारी सातारा नगरपालिकेतील नगरसेवकांची खास बैठक पार पडली. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे दोघेही उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून पालिकेतील दोन्ही राजेंच्या समर्थक नगरसेवकांमध्ये अंतर्गत मतभेद आणि गटबाजीची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी एकत्र येत नगरसेवकांची कानउघाडणी केल्याची माहिती समोर आली आहे.

पालिकेच्या कामकाजात कोणताही गोंधळ किंवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उदयनराजेंनी बैठकीनंतर दिला. विशेषतः पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव कमी असल्याचे सांगत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही केल्या. या बैठकीमुळे साताऱ्यातील स्थानिक राजकारणालाही नवे वळण मिळाल्याची चर्चा सुरू आहे. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले हे पुन्हा एकत्र दिसल्याने आगामी राजकीय समीकरणांबाबतही अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

Exit mobile version