Maharashtra Bhushan Award ceremony : राज्य सरकारच्या वतीने मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे यावेळी लाखो लोकांनी यावठिकाणी हजेरी लावली. पण कार्यक्रमानंतर अनेकांना उष्मघाताचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान नागपूरमधील वज्रमूठ सभा पार पडताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या घटनेतील रुग्णांची हॉस्पिटलमध्ये जात भेट घेत विचारपूस केली.
महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागल्याची घटना घडली. उष्माघाताचा त्रासामुळे (Heat stroke) 11 श्री सेवकांचा दुदैवी मृत्यू झाला, तर अत्यवस्थ असलेल्या अनेक सदस्यांवर कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन अत्यवस्थ रुग्णांची विचारपूस केली. तसेच राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच अत्यवस्थ श्री सदस्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल अशी घोषणा देखील शिंदे यांनी केली.
दरम्यान नागपूरमध्ये महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली होती. सभा संपताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट रुग्णालयात जाऊन अत्यवस्थ रुग्णांची भेट घेतली. यावेळी या घटनेवरून ठाकरे व पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. ठाकरे यांनी कार्यक्रमाची चुकीची वेळ आणि ढिसाळ नियोजनामुळे या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागलं, अशी टीका केली.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, गृहमंत्री अमित शाह यांना जायचं होतं म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन भर दुपारी करण्यात आले असेल तर चौकशी कोण कोणाची करणार? शाह यांना जायचं होतं म्हणून जर दुपारच्या वेळेत कार्यक्रम घेतला गेला असेल तर हा विचित्र प्रकार आहे, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
याप्रकरणावर बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले हलगर्जीपणा झाल्यावर काय घडू शकते, हे आजच्या घटनेवरून महाराष्ट्राला पाहायला मिळालं. किती मृत्यू झालेत हे अजून कळत नाहीये.कार्यक्रम संपल्यानंतर थोडी गर्दी झाली आणि त्यात चेंगराचेंगारी झाली असे काही सांगतायत.
उन्हाळा भरपूर आहे आणि अशातच कार्यक्रमाची वेळ दुपारी निवडणे हे आयोजकांचं चुकलेलं आहे. हे का घडलं, कोणी हलगर्जीपणा दाखवला, कोणी दुर्लक्ष केले? या सर्व गोष्टी नंतरच्या. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. कार्यक्रमाला 14 कोटींचा बजेट होतं. सरकारने एवढी रक्कम खर्च केली तर अशा घटना घडायला नको होत्या, असेही अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळयाला गालबोट, 11 जणांचा मृत्यू
दरम्यान रुग्णालयात भेट देण्यासाठी गेलेले असताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत विरोधी पक्ष नेता अजित पवार आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत , अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील रुग्णाची विचारपुस केली.