उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी; पण ‘या’ अटींचं पालन करावं लागणार

Dasara Melava 2026 : उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने अधिकृत परवानगी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे दादरच्या

Dasara Melava 2026

Dasara Melava 2026

Dasara Melava 2026 : उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने अधिकृत परवानगी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी बीएमसीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी परवानगी मागितली होती. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाला 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी आणि 19 ऑक्टोबर रोजी पूर्वतयारीसाठी 2 दिवसांची परवानगी दिली आहे. यासाठी पालिकेने 24 अटी- शर्ती देखील घातल्या आहेत. तसेच या मेळाव्याच्या आयोजनासाठी ठाकरे गटाला प्रतिदिन 500 रुपये + 18 टक्के जीएसटी आणि 250 रुपये परवाना शुल्क तसेच 20 हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

दसरा मेळाव्यासाठी महानगरपालिकेच्या 24 अटी

मैदानाचा ताबा :

19 ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाच्या तयारीसाठी मैदान उपलब्ध करून दिले जाईल. 20 ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यक्रमासाठी सकाळी 6 वाजता मैदानाचा ताबा मिळेल. रात्री 12 वाजेपर्यंत मैदान रिकामे करणे बंधनकारक असेल.

भाडे व शुल्क :

मैदानासाठी दररोज 500 रुपये भाडे, त्यावर 18 टक्के GST आणि 250 रुपये परवाना शुल्क आगाऊ भरावे लागेल.

अनामत रक्कम :

20 हजार रुपये अनामत रक्कम आगाऊ जमा करावी लागेल.

परवानगी रद्द झाल्यास :
कोणत्याही कारणास्तव महानगरपालिकेने परवानगी रद्द केल्यास आयोजकांना कोणताही दावा किंवा भरपाई मागता येणार नाही.

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन :

उच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्रमांक 218/2010 आणि अन्य संबंधित आदेशांनुसार शिवाजी पार्क मैदान हे सायलेन्स झोनमध्ये येते. त्यामुळे संबंधित नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.

ध्वनिप्रदूषणावर निर्बंध :
रात्री 10 वाजल्यानंतर लाऊडस्पीकर किंवा कोणत्याही प्रकारचे ध्वनिवर्धक वापरता येणार नाहीत. ध्वनिप्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल.

मैदानात वाहनांना प्रवेश नाही :

शिवाजी पार्क मैदानाच्या आत कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही. मैदानात पार्किंग करता येणार नाही.

मैदानाचे नुकसान करण्यास मनाई :

मैदानात खोदकाम करणे, खड्डे करणे, खिळे ठोकणे किंवा कोणत्याही प्रकारे मैदानाचे नुकसान करण्यास बंदी असेल.

स्वच्छतेची जबाबदारी आयोजकांची :

कार्यक्रमानंतर निर्माण झालेला कचरा, घाण आणि निर्माल्य आयोजकांनी स्वतः हटवून मैदान स्वच्छ करावे लागेल.

मैदान पूर्ववत करणे :

कार्यक्रम संपल्यानंतर मैदान पूर्वीच्या स्थितीत आणून महानगरपालिकेकडे सुपूर्द करावे लागेल.

नुकसान झाल्यास कारवाई :

मैदानाचे नुकसान झाल्यास अनामत रक्कम जप्त केली जाऊ शकते. तसेच पुढील वर्षी मैदानाच्या वापरासाठी परवानगी नाकारली जाऊ शकते.

पोलीस व इतर विभागांची परवानगी :

मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाची स्वतंत्र परवानगी घेणे आयोजकांसाठी बंधनकारक असेल.

बेकायदेशीर बांधकामास मनाई :

मैदानात कोणतेही पक्के बांधकाम करता येणार नाही. स्टेज उभारण्यासाठी खोदकाम करण्यासही मनाई असेल.

बॅनर व जाहिरातींसाठी स्वतंत्र परवानगी :

जाहिरात किंवा बॅनर लावायचे असल्यास महानगरपालिकेच्या संबंधित जाहिरात विभागाची स्वतंत्र परवानगी घ्यावी लागेल.

कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी :

कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असेल. परिस्थिती बिघडल्यास परवानगी तात्काळ रद्द केली जाऊ शकते.

परवानगीची मर्यादा :

महानगरपालिकेची परवानगी केवळ मैदानाच्या वापरापुरती मर्यादित असेल. इतर आवश्यक परवानग्यांचा त्यात समावेश नसेल.

खाद्यपदार्थ व स्वयंपाकास मनाई :

मैदानात स्वयंपाक करणे, चूल पेटवणे किंवा कोणत्याही प्रकारे अग्नीचा वापर करण्यास परवानगी नसेल.

रस्ता व फूटपाथ अडवण्यास मनाई :

रस्ता किंवा फूटपाथवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करता येणार नाही. नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी आयोजकांना घ्यावी लागेल.

विद्युत जोडणीसाठी परवानगी :

विद्युत जोडणी करताना नियमानुसार संबंधित विभागाची परवानगी घेणे आवश्यक असेल. विद्युत सुरक्षेची संपूर्ण काळजी घ्यावी लागेल.

पावसामुळे कार्यक्रम रद्द झाल्यास :

नैसर्गिक आपत्ती किंवा पावसामुळे कार्यक्रम रद्द झाल्यास त्यासाठी महानगरपालिका जबाबदार राहणार नाही.

कर्मचाऱ्यांची सुरक्षा :

कार्यक्रमासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि विम्याची जबाबदारी आयोजकांची असेल.

शांतता व शिस्त राखणे :

कार्यक्रमादरम्यान आक्षेपार्ह भाषण किंवा गोंधळ होणार नाही, याची आयोजकांनी काळजी घ्यावी.

परवानगी हस्तांतरित करता येणार नाही :

महानगरपालिकेकडून देण्यात आलेली परवानगी कोणत्याही अन्य व्यक्ती किंवा संस्थेला हस्तांतरित करता येणार नाही.

रशियाकडून तेल खरेदीवर टॅरिफ नाही, अमेरिकेने दिला भारताला मोठा दिलासा –

परवानगी रद्द करण्याचा अंतिम अधिकार :

या अटींपैकी कोणत्याही अटीचा भंग झाल्यास सहाय्यक आयुक्त (जी/उत्तर) यांना परवानगी रद्द करण्याचा अंतिम अधिकार राहील.

Exit mobile version