मुंबई यांनी इतकी लुटली की यू आणि आर नावाने हप्ते जायचे, असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नाव न घेता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी गंभीर आरोप केले. राणे आज पत्रकार परिषदेत बोलत होते. आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेट सादर केलंय. बजेट सादर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून टीका-टीपण्या केल्याचं पाहायला मिळालंय. त्यावरुन मंत्री नारायण राणे यांनी उध्दव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत.
राणे म्हणाले, येणाऱ्या आगामी निवडणुकीत मुंबईत आम्ही भाजपची सत्ता आणणार म्हणजे आणणारच. याचे कारण म्हणजे शिवसेनेने मुंबईला लुटलं आहे. पण आता बस्स झालं, यांनी मुंबईला इतकं लुटलं की ‘यु’ आणि ‘आर’ नावाने हप्ते जात होते. मुंबईला यांनी विदृप करुन टाकल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केलाय. दरम्यान, यावेळी राणे यांनी उध्दव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर आरोप केलाय.
तसेच आजच्या अर्थसंकल्पावरही त्यांनी भाष्य केलंय. आम्ही मुंबईसाठी तरतूद करत आहोत. तसेच मुंबईसाठी तरतूद करायला आम्ही लावू. मुंबईला कोणत्याही प्रकल्पासाठी पैसे लागले तर आम्ही ते उपलब्ध करून देऊ. यासाठी ते आमचे ऐकतील एवढा आम्हाला विश्वास असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
यावेळी नारायण राणे यांनी पत्रकारांनाही धारेवर धरल्याचं पाहायला मिळालंय. काही पत्रकारांकडून इंधन दरवाढीवर प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारलेल्या पत्रकाराला थेट शिवसेनेचे प्रवक्ते असल्याचं म्हंटलंय.
तुम्ही पत्रकार नाही तर सोशल वर्कर झाला आहात. नाहीतर शिवसेनेचे प्रवक्ते झाले आहात, असं थेट वक्तव्य राणेंनी पत्रकारांना केलं. राणेंना पत्रकारांना असं बोलल्यानंतर काही पत्रकारांनी त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
प्रश्न विचारल्याने कोणी प्रवक्ते होतं का? प्रश्न विचारणे आमचे काम आहे, या शब्दांत असं काही पत्रकारांनी त्यांना सुनावलंय. दरम्यान, राणे यांच्या या वक्तव्यानंतर पत्रकार आणि नारायण राणे यांच्यात काही प्रमाणात शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालंय.