Amit Shah in Maharashtra : राज्यात नाही तर देशभरातच भाजपला एका मुद्द्यावर स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांचीच नाराजी सहन करावी लागते. हा मुद्दाही तितकाच संवेदनशील आहे. दुसऱ्या पक्षांतून नेते मंडळींची आयात करून त्यांना आपल्या पक्षात मानाची पदं देणं. सरकारमध्ये मंत्री करणं असे प्रकार सुरू आहेत. याच प्रकारांवरून भाजपाचे एकनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते कमालीचे नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समोरच बोलून दाखवली. अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
येथे आल्यानंतर त्यांनी भाजपाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. निवडणुकीच्या आधी करायच्या कामांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षातून काम करणाऱ्या नाराज कार्यकर्त्यांना जोडून घ्या असे अमित शाह म्हणाले. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला. बाहेरून पक्षात घेतल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांत नाराजी आहे का असा हा प्रश्न होता. यावर कार्यकर्त्यांनी थेट हो असेच उत्तर दिले.
यानंतर अमित शाहांनी दुसरा प्रश्न विचारला. पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ काम करणारे किती जण या सभागृहात आहेत. त्यावर बहुतांश कार्यकर्त्यांनी हात वर केले. ज्यांना पंधरा वर्षात काहीच मिळालं नाही तर त्याऐवजी नुकत्याच पक्षात आलेल्यांना किती दिलं जाईल. तुम्ही काळजी करू नका, असे उत्तर अमित शाहा यांनी हसत हसत दिले. मात्र यावेळी काहीजण व्यासपीठावर बसलेल्या अशोक चव्हाण यांच्याकडे आवर्जून बोट दाखवत होते.
जागावाटपाबाबत मोठी अपडेट! भाजप 155 ते 160, शिंदे अन् अजितदादांना मिळतील ‘इतक्या’ जागा
दरम्यान, काल अमित शाहांनी छत्रपती संभाजीनगर येथेही बैठक घेतली. या बैठकांत जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत एका तासाहून जास्त वेळ जागावाटपावर चर्चा सुरू होती अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. भाजपाच्या कोअर कमिटीचीही बैठक पार पडली. यानंतर महायुतीची बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यावर प्राथमिक चर्चा झाली. या बैठकीत भाजपला 155 ते 160 जागा, एकनाथ शिंदे गटाला 80 ते 85 तर अजित पवार गटाला 55 ते 60 जागा देण्याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती मिळाली.
लहान अन् मोठा भाऊ नाही तर..,; नाना पटोलेंनी मविआच्या जागावाटपाचा फॉर्मुला सांगितला