मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांत कमाल तापमानात पाच अंशाने वाढ झाली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस सौम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजनुसार, महाराष्ट्रात थंडीची लाट 2 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात थंडी जास्त प्रमाणात असेल. तर मुंबईचे तापमान देखील कमी होऊ शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
अवकाळी पावसाचा अंदाज असल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. आधीच वाढत्या थंडीचा पिकांवर परिणाम होत आहे. त्यात पुन्हा पाऊस आला तर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा होऊ शकतो.
या बदलत्या हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू, हरभरा, मका या पिकांवर देखील या वातावरणाचा परिणाम होऊन उत्पादनात घट होऊ शकते. खरीप हंगामात आधीच अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा आता रब्बी हंगामातील पिकांवर आहेत. मात्र, हवामानातील बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.