छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या औरंगजेबाच्या कबरीला भेट देण्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी आंबेडकर यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. अशात छत्रपती संभाजीनगरचे खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलिल यांनी मात्र आंबेडकर यांच्या या कृतीचे स्वागत केले आहे. यामुळे आपल्या जुन्या मित्रपक्षासोबत आंबेडकर यांचे सुर पुन्हा जुळल्याचे पाहायला मिळतं आहे. (Vanchit Bahujan Aaghadi Prakash Ambedkar MIM Imtiyaj Jalil)
आंबेडकर यांच्या औरंगजेबच्या कबरीला भेट देण्यावर इम्तियाज जलिल म्हणाले, प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेब यांच्या कबरीला भेट दिली. त्यांच्या या कृतीचे मी स्वागत करतो. यावरून आता त्यांच्यावर टीका होईल, त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जाईल. पण, त्यांनी जे धाडस केले त्याचे स्वागत केले पाहिजे आणि इतरांनीदेखील असे धाडस केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती जाहीर झाली. ठाकरे आणि आंबेडकर दोघेही सोबत दिसून येत आहेत. मात्र आता उद्धव ठाकरेंना आंबेडकरांंचे औरंजेबाच्या कबरीवर जाणे मान्य आहे काय? हे स्पष्ट करावं, असं म्हणतं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फटकारलं आहे.
भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शत्रुच्या समाधीवर डोके टेकवणाऱ्या व्यक्तीला मित्र बनवणे मान्य आहे का? हिंदुत्वाच्या नावावर काम करणाऱ्या अशा पक्षाचा धिक्कार असो. उद्या जर संजय राऊत यांच्या बोलण्यात येऊन उद्धव ठाकरेही औरंगजेबाच्या कबरीवर फुलं अर्पण करायला गेले तर आश्चर्य वाटणार नाही.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दादा भुसे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी जे केले ते योग्य नाही.
लंडनमध्ये असो, मुंबईत असो, उद्धव कुठेही असो, भूमिका स्पष्ट करा :
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना तत्काळ अटक करण्याची मागणी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन डोके टेकवून त्यांनी तमाम शिवाजी भक्तांचा अपमान केला आहे, त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, औरंगजेबावरुन वाद निर्माण करणाऱ्यांनी आधी स्वत:चे चारित्र्य बघावे. तुम्ही औरंगजेबाच्या दरबारात कामाला होतात की नाही, दरबारात नोकऱ्या करत होते की नाही, हे सांगावं. आम्ही तर दरबारात साधं चोपदारही नव्हतो, त्यामुळे लोकांना शहाणपणा शिकवताना प्रथम आपला इतिहास तपासावा. तसंच लोकांच्या श्रद्धेचा मान ठेवला पाहिजे असंही ते म्हणाले.