मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे दोन्ही शिवसेनेला (Shivsena) एक आणणार का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. याचं कारण म्हणजे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलेलं नुकतचं एक जाहीर भाषण. याच भाषणातून आंबडेकरांनी शिवसेना (UBT) चे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलेला सल्ला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलेली ऑफर. नुकतेच प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील एका जाहीर सभेत भाषण केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीच्या नादी न लागण्याचा आणि एकनाथ शिंदे यांना भाजपचा हात सोडून सोबत येण्याचा सल्ला दिला. यावरुनच या चर्चांना सुरुवात झाली आहे. (Vanchit Bahujan Aaghadi Prakash Ambedkar on Uddhav Thackeray, Eknath Shinde and ShivSena)
उद्धव ठाकरेंना सल्ला देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, नुकतचं महापालिका निवडणुकीसंबंधिचा एक अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल तयार केला आहे, देवेंद्र फडणवीस यांनी. या अहवालाचा उद्देश काय आहे, तर शिवसेनेतील किती माणसं आपल्या गळाला लागतात हे बघायचं आहे. गळाला नाही लागली तरी घरी किती जण बसतील हे बघण्याचा हेतू आहे. पक्ष संपविण्याचा, संघटना संपविण्याचा हेतू आहे. कार्यकर्त्यांना नामोहरम करण्याचा हेतू आहे. त्यांनी सार्वजनिक जीवनात राहू नये हा हेतू आहे.
त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना आणि मित्रांना आम्ही सांगतो की महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका. काँग्रेस केंद्रीय नेतृत्वात अडकलं आहे. तर राष्ट्रवादी कुटुंबवादात अडकलेलं आहे. यात तुमचा फक्त बळी जाऊ देऊ नका हे फक्त लक्षात घ्या. पावलं ताबडतोब उचलली तर वाचू शकतो, अन्यथा आपल्याला नागडं गावामध्ये फिरावं लागतं हा इतिहास आहे. आरपीआयच्या कार्यकर्त्यांना हा इतिहास जवळून माहित आहे. आमच्या अनुभवाचा फायदा घ्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या तीन दिवसांनंतर माझी आणि एकनाथ शिंदेंची भेट झाली. मी त्यांना म्हटलं पेढे द्या.ते म्हणाले, पेढ्याच काय घेऊन बसलात? तुम्हाला दुधाने अंघोळ घालतो. दिड वर्ष आम्ही आता अबाधित झालो. मी म्हणालो मला कशाला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना घाला. आणलयं तुमचं सरकार सर्वोच्च न्यायालयाने, टिकवलं त्यांनी, आमचा काय त्यात रोल? ते म्हणाले, प्रकाशराव काहीही असो, रिक्षावाल्याला दिड वर्ष मिळाली. मी म्हटलं म्हणूनच मी तुमच्यावर टीका करत नाही. आतापर्यंत श्रीमंताची माणसं मुख्यमंत्री झाली, आता एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, त्यातच आमचा आनंद आहे.
पुढे मी काही बोलण्यापेक्षा शिंदेंच म्हणाले, प्रकाशराव ही राज्यघटना आहे म्हणून, नाही तर कोणी विचारलं नसतं आपल्याला. मी म्हटलं तुमचे मित्र, त्यांचं काय? त्यावर ते म्हणाले, काय अवघडं जागेचं दुखणं असतात. काही गोष्टी बोलायच्या नसतात, फक्त सहन करायच्या असतात. म्हटलं पडा बाहेर, आपण एकत्र येऊ आणि पुढे जाऊ, अशी ऑफर देत आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांना भाजपचा हात सोडून सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला.