Download App

SSC Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, आजपासून हॉलतिकीट मिळणार

मुंबई : दहावीच्या (10th)विद्यार्थ्यांसाठी (Students)अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Boards of Secondary and Higher Secondary Education)वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचं (SSC Exam) हॉलतिकीट (Hall ticket)विद्यार्थ्यांना आज दुपारी तीन वाजता शाळेच्या लॉगइनमधून उपलब्ध करुन दिलं जाणार असल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आलीय.

राज्यातील दहावीच्या लेखी परीक्षेला 2 मार्चपासून सुरुवात होणारंय. त्याआधी 10 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षांना (Practical Examinations) सुरुवात होणारंय. या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या हॉलतिकीटचं वितरण आजपासून केलं जाणारंय. त्यामुळं विद्यार्थ्यांना दुपारी 3 नंतर आपल्या शाळेत आज हॉलतिकीट मिळणार आहे. शाळेकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या हॉलतिकीटावर सही आणि शिक्का असावा, तसेच हॉलतिकीटची ऑनलाईन प्रिंट देताना शाळा कोणत्याही प्रकारचं शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारणार नाहीत.

परीक्षार्थींच्या हॉलतिकीटच्या प्रिंटवर मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का असावा. हॉलतिकीटमध्ये विषय व माध्यम बदल असल्यास त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्या लागणार आहेत. तसेच फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचं नाव, जन्मतारीख आणि जन्मस्थळ याबद्दल दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडं त्वरित पाठवावेत असंही मंडळाकडून सांगण्यात आलंय.

बऱ्याचदा परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट गहाळ होण्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. त्यामुळं हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित शाळांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईनं द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्याला प्रवेशपत्र द्यायचं आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारुन स्वाक्षरी करावी, असंही राज्यमंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिलेल्या पत्रात म्हटलंय.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान होणारंय. तर सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता पेपर होणारंय. आत्तापर्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये 10 मिनिटं उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना पेपरला संधी दिली जात होती. मात्र यावेळी राज्य मंडळानं उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याच्या सूचना केंद्रांना दिल्या आहेत. त्यामुळं परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणं गरजेचं आहे.

Tags

follow us