अकोल्यात बनावट गुटखा प्रकरणात ट्वीस्ट, भाजप नेत्याला हादरा, जवळच्या नातेवाईकावर गुन्हा

अकोल्यात एमआयडीसी परिसरात अन्न व प्रशासन विभागाच्या पथकांनी छापे टाकले, 2 गुटख्यांच्या कारखान्यावर हे छापे टाकले.

News Photo   2026 07 18T213402.851

अकोल्यात बनावट गुटखा प्रकरणात ट्वीस्ट, भाजप नेत्याला हादरा, जवळच्या नातेवाईकावर गुन्हा

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Mundhe) गेल्या काही काळापासून अॅक्शन मोडमध्ये आहेत. मुंढे यांच्या नेतृत्वातील पथकाने राज्यातील विविध ठिकाणी कारवाई करत अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केलेली आहे. अशातच आता तुकाराम मुंढे यांच्या पथकाने अकोल्यात केलेल्या गुटखा कारवाई प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

बनावट गुटखा कारखाना प्रकरणात अकोला महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. अभिषेक गई असं गुन्हा दाखल झालेल्या अभियंताचे नाव असून ते भाजपचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विनोद मापारी यांचे सख्खे भाचे आहेत. अकोल्यात एमआयडीसी परिसरात 2 गुटख्यांच्या कारखान्यावर FDA ने छापे टाकले होते.

गुटखा माफियांना धक्का, नागरिकांना नवी ताकद; तुकाराम मुंढेंचे एआय तक्रार पोर्टल सुरू

यावेळी तब्बल दीड कोटींच्या जवळपास मुद्देमाल जप्त झाला होता. तर दोन्ही गुटखा कारखाने राजकीय पदाधिकारी म्हणून ओळख असलेल्या गौरव शर्मा नामक व्यक्तीचे असल्याचे तपासात समोर आले. सध्या तो फरार आहे. मात्र, दुसरीकडे यातील एक गुटखा कारखाना हा महापालिकेतील कनिष्ठ अभियंता तथा भाजपचे माजी उपमहापौराचा भाचा अभिषेक गई यांच्या मालकीच्या जागेत होता. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

अभिषेक गई याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे माजी उपमहापौर विनोद मापारी यांनी मौन सोडलं आहे. एमआयडीसीतील ते गोदाम अधिकृतपणे 500 रुपयांच्या बॉण्डवर भाडे करारनामा म्हणून भाडेतत्त्वावर दिले होते. मात्र इथे सुरू असलेल्या गुटखा कारखान्याबद्दल मला किंचितही कल्पना नव्हती. दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अकोला जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या रॅकेटमागील इतर संबंधितांचा शोध सुरू आहे. आता आगामी काळात यातील आणखी काही आरोपी सापडण्याची शक्यता आहे.

Exit mobile version