गुटखा माफियांना धक्का, नागरिकांना नवी ताकद; तुकाराम मुंढेंचे एआय तक्रार पोर्टल सुरू
राज्यभरात सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत.
Tukaram Mundhe’s AI complaint portal launched : राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बनावट औषधांविरोधात सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी आणि कारवाया सुरू केल्या असून, अनेक अन्न माफिया आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर मोठा आळा बसल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही महिन्यांत अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा, पानमसाला, बनावट औषधे आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त केले आहेत. या कारवायांमुळे जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुकाराम मुंढे यांनीही स्पष्ट शब्दांत इशारा देत, लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे सांगितले आहे. यापुढील काळातही अशा गैरप्रकारांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? अमेरिका-इराण संघर्षाने जगाची धडधड वाढवली
दरम्यान, नागरिकांना थेट प्रशासनाशी जोडण्यासाठी आणि तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने एआयवर आधारित अत्याधुनिक नागरिक तक्रार पोर्टल सुरू केले आहे. सुशासनाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आता कोणताही नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलून आपली तक्रार सहज नोंदवू शकतो.
भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे, कालबाह्य उत्पादने तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाबाबत नागरिकांना फक्त आपली माहिती बोलून सांगायची आहे. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता त्या माहितीचे स्पष्ट, सुसंगत आणि संपूर्ण तक्रारीत रूपांतर करते. ही तक्रार आपोआप संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते. विशेष म्हणजे, तक्रारीवर वेळेत कार्यवाही झाली नाही तर प्रणालीद्वारे स्वयंचलितपणे त्याचा पाठपुरावा आणि एस्कलेशन केले जाते. त्यामुळे तक्रारींच्या निपटाऱ्यातील विलंब कमी होण्यास मदत होणार आहे.
या नव्या व्यवस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तक्रारदाराला आपल्या तक्रारीचा संपूर्ण प्रवास पारदर्शकपणे पाहता येणार आहे. तक्रार नोंदविण्यापासून ते अंतिम कारवाईपर्यंतची प्रत्येक माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रशासनावरील विश्वास वाढण्यास आणि नागरिकांचा सहभाग अधिक प्रभावी होण्यास मदत मिळणार आहे.
हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचं निधन की आत्महत्या?, कारमध्ये संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ
या उपक्रमाबाबत माहिती देताना तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, सुशासन म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नव्हे, तर नागरिकांसाठी शासन अधिक सुलभ, जलद, पारदर्शक आणि उत्तरदायी बनवणे होय. नागरिकांचा सहभाग, तंत्रज्ञानाची ताकद आणि प्रशासनाची जबाबदारी यांचा संगम घडवून सार्वजनिक आरोग्य संरक्षण अधिक प्रभावी करण्याचा हा प्रयत्न आहे.
फेसबुकवरील आपल्या पोस्टमधून त्यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले की, प्रत्येक तक्रार महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट किंवा निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. राज्यात भेसळमुक्त अन्न आणि सुरक्षित औषधांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाची जोड देत उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे सार्वजनिक आरोग्य संरक्षणाची मोहीम आणखी प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अन्नातील आणि औषधातील भेसळीच्या तक्रारासाठी टोल फ्री नंबर-
टोल फ्री क्रमांक : 1800222365
ई-मेल : jc-foodhq@gov.in
एआय पोर्टल – complaints.mahafda.in