Amravati Graduate Constituency Election : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी (Pune) सुरू होत असतानाच महायुतीतील अंतर्गत राजकारणाची नवी समीकरणे समोर येऊ लागली आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याची चर्चा असून विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित मानले जात आहे. मात्र, अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्यापुर्वीच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी वेगळ्या उमेदवाराला साथ दिल्याने शिवसेनेसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार दिलीप कडू यांच्या समर्थनार्थ थेट शक्तिप्रदर्शन केले. कडू यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापुर्वी खोडके दाम्पत्याच्या उपस्थितीत मोठी सभा घेण्यात आली. त्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कडू यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या माध्यमातुन त्यांनी निवडणुकीच्या मैदानात आपली संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.
दिलीप कडू यांच्या शक्तिप्रदर्शनाला नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर आडबाले यांचीही उपस्थिती होती. त्यामुळे महायुतीकडुन अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्याआधीच सत्ताधारी आघाडीतील काही लोकप्रतिनिधी दुसऱ्या उमेदवाराच्या व्यासपीठावर दिसल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. एकीकडे शिवसेनेकडुन किरण सरनाईक यांचे नाव पुढे असताना राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी कडू यांना दिलेली साथ अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.
पुणे शिक्षक, पदवीधर मतदार संघ भाजपला; चंद्रकांत पाटलांच्या जवळच्या व्यक्तीला; शिक्षकचे तिकीट फिक्स
खोडके दाम्पत्याने दिलीप कडू यांना दिलेला पाठिंबा नेमका स्थानिक राजकारणापुरता मर्यादित आहे की त्यामागे महायुतीच्या अधिकृत समीकरणांना वेगळे वळण देण्याची भूमिका आहे, याची चर्चा आता सुरू झाली आहे. विशेष म्हणजे उमेदवारीची अंतिम घोषणा होण्याआधीच महायुतीतीलच लोकप्रतिनिधी वेगळ्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय झाल्याने शिवसेनेच्या गोटातही या घडामोडीकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघातील राजकीय चित्र आणखी रंगतदार झाले आहे.
या मतदारसंघात महायुतीसमोर उमेदवारीचा पेच निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनीही पक्षाकडुन उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पक्षाकडुन उमेदवारी न मिळाल्यास शिक्षक आघाडीच्या माध्यमातुन निवडणूक लढवण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय देशपांडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणुनही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीसमोर अधिकृत उमेदवार ठरवतानाच संभाव्य बंडखोरीचे आव्हानही कायम आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघातील या घडामोडींमुळे महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय आणि त्यानंतरची भूमिका याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडुन किरण सरनाईक यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असतानाच राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिलीप कडू यांना दिलेली साथ आणि श्रीकांत देशपांडे यांची स्वतंत्र तयारी यामुळे समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत. त्यामुळे अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीतील सर्व घटक पक्ष आणि इच्छुक नेते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
