Download App

सुधीर मुनगंटीवार यांचा गेम कोणी केला…?

अखेरीस नको, नको म्हणत असतानाही भाजपने (BJP) सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना जबरदस्तीने लोकसभेच्या घोड्यावर बसवले आहे. आता त्यांना टाच मारुन तो घोडा पळवावाच लागणार आहे. मी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढविण्यासाठी इच्छुक नाही. त्या दृष्टीने मी तयारी देखील केलेली नाही, मला राज्याच्याच राजकारणात रस आहे, ही गोष्ट ते विविध माध्यमातून पक्ष नेतृत्वाला वारंवार सांगत होते. पण चंद्रपूरमध्ये दुसरा सक्षम उमेदवार नसल्याचे कारण देत भाजपने त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. वर वर दिसणारे साधे सरळ सोपे हे चित्र आतून मात्र तसे नाही. मुनगंटीवार यांना केंद्रात जाण्यापेक्षा राज्यातच राहण्यात अधिक रस का होता यामागे त्यांची भविष्यातील संधीचा विचार होता. तर त्याचवेळी त्यांना जबरदस्तीने घोड्यावर बसवून राज्यातील काही नेत्यांनी त्यांचाच गेम केल्याचे बोलले जात आहे.

नेमके काय आहे हे अंतर्गत राजकारण आणि मुनगंटीवार यांना राज्याच्याच राजकारणात का अधिक रस होता? पाहुया सविस्तर

सुधीर मुनगंटीवार यांचा राज्याच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे. 2014 पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षाही राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे याच भाजपच्या नेत्यांच्या नावाची चर्चा होत असे. 2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतरही मुख्यमंत्रीपदासाठी खडसे, मुनगंटीवार, तावडे, गडकरी यांच्याच नावाची चर्चा अधिक होती.

पण केंद्रातून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे मुनगंटीवार काहीसे बाजूला सारले गेले. मात्र, तरीही त्यांनी कोणतीही आक्रमक भूमिका न घेता राज्यातील नेतृत्वाशी जुळवून घेतले. त्यांनी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपद स्वीकारले. त्यानंतर शिंदेंच्या मंत्रिमंडळात वनमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अशी दुय्यम दर्जाची खाती स्वीकारली. आता मात्र, त्यांना थेट दिल्लीच्या राजकारणात पाठवून देण्याची राजकीय खेळी खेळण्यात आल्याची चर्चा आहे.

शिंदे गटाला खिंडार पडणार, CM शिंदेंचे १२ आमदार ठाकरेंकडे परतणार; असीम सरोदेंचा मोठा दावा

सध्या विदर्भात भाजपच्या चार नेत्यांकडे बडे नेते म्हणून पाहिले जाते. यात नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार या नेत्यांच्या नावाचा उल्लेख करावा लागतो. यातील गडकरी आधीपासूनच केंद्राच्या राजकारणात रमले आहेत. तर बावनकुळे यांचे 2019 मध्ये तिकीट कापल्याने त्यांनीही फडणवीस यांच्याशी जुळवून घेणे पसंत केले.

त्यानंतर बावनकुळे यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाली, पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष पदावरही त्यांचीच वर्णीही लागली. त्यानंतर त्यांनी फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारल्याचे चित्र दिसून आले. आता याच फडणवीस-बावनकुळे यांच्या जोडीने मुनगंटीवार यांना केंद्रात पाठवून विदर्भातील एक आपला स्पर्धकच राज्याच्या राजकारणातून कमी केल्याची चर्चा आहे.

राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने विचार करायचा तर राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आल्यास नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, सुधीर मनुगंटीवार यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून चर्चा होत असते. आता गडकरी आणि तावडे हे दोघेही चर्चेचील चेहरे केंद्राच्या राजकारणात रमले आहेत. पाठोपाठ पंकजा मुंडे यांनाही लोकसभेचे तिकीट दिले आहे.

Lok Sabha Elections : महायुतीच्या 42 जागांचा तिढा सुटला, केवळ 6 जागांची बोलणी बाकी

गिरीश महाजन हे अद्यापही स्वतःला फडणवीस यांच्या छत्रछायेतून बाहेर काढू शकलेले नाहीत. फडणवीस आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून कधीकाळी 14 खाती संभाळणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचेही महत्व राज्याच्या राजकारणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. अजितदादांकडे पुण्याचे पालकमंत्री दिल्यानंतर चंद्रकांत पाटील पुण्याच्या राजकारणातूनही गायब झाल्याचे दिसून येत आहे. केवळ कोथरुडचे आमदार एवढीच त्यांची पुण्याच्या राजकारणात चर्चा होते.

राहिला प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांचा. जर उद्या सत्ता आलीच तर आपले नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत तरी असावे अशी अपेक्षा ठेवून त्यांनी आपल्याला केवळ राज्याच्या राजकारणात रस असल्याचे म्हटले होते. फडणवीस-बावनकुळे यांच्या जोडीने मात्र मुनगंटीवार यांना केंद्रात पाठवायचेच असा निर्धार केला आहे. ते ऐकण्याच्या मनस्थित नसल्याचे पाहून मुनगंटीवार यांनीही मग थेट एकनाथ शिंदे यांना साकडे घातले.

“नव्या संसदेत चंद्रपूरचे सागवान लागले आहे. संसदेची दारे इथल्या लाकडाची आहेत. या दारातून मला आत जावे लागू नये, यासाठी आपण आपले वजन वापरावे…” अशी विनंती त्यांनी थेट शिंदे यांना केली होती. वास्तविक भाजपची उमेदवारी होती, त्याबाबत भाजप निर्णय घेणार होता. पण तरीही त्यांनी शिवसेनेच्या नेत्याला विनंती केली. यातून त्यांच्यात आणि फडणवीस यांच्यात काही आलबेल नसल्याचे दिसून आले होते.

आता मुनगंटीवार यांना केंद्राच्या राजकारणात पाठविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे फडणवीस त्यांच्या नेतृत्वात बावनकुळे-महाजन यांचेच राज्याच्या राजकारणात वर्चस्व राहणार हे तर नक्की.

follow us