Download App

नागपूर विद्यापीठात शिकवला जाणार भाजप आणि रामजन्मभूमी आंदोलनाचा इतिहास, काँग्रेसच्या इतिहासाला कात्री!

  • Written By: Last Updated:

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) अभ्यासक्रमात नवीन बदल करण्यात आले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने एमए द्वितीय वर्ष चौथा सेमिस्टरचा अभ्यासक्रम बदलला आहे. आता केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा (BJP) इतिहास अभ्यासक्रमात शिकवला जाणार आहे. त्यासाठी काँग्रेस (Congress) आणि कम्युनिस्ट पक्षाचा इतिहासाला कात्री लावली आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळं मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

आता नागपूर विद्यापीठात जनसंघ आणि भाजपचा इतिहास शिकवला जाणार आहे. अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.शाम कोरेटी यांनी याबाबत माहिती दिली आहे. नव्या धोरणानुसार, इतिहास अभ्यासक्रमाची व्याप्ती 1948 ते 2010 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ‘राष्ट्रीय राजकीय पक्ष’ प्रकरणात कॉंग्रेसचा इतिहास कमी करण्यात आला. त्याच्या जागी जनसंघाची स्थापना, भाजपची स्थापना, विस्तार, विचारधारा, राष्ट्रीय भूमिका इत्यादी सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. याशिवाय 1980 ते 2000 दरम्यानचे आंदोलन म्हणून रामजन्मभूमी आंदोलन शिकवले जाणार आहे. हा अभ्यासक्रम 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात येणार आहे.

नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी सर्व पक्ष आणि जनसंघाचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला होता. आता जनसंघाच्या इतिहासात भाजपचा इतिहासाचा समावेश करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल करण्याच्या निर्णयामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपचा इतिहास सांगण्यासारखा आहे का? त्यांना कुठला इतिहास आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांना ना स्वातंत्र्यापूर्वीच्या लढाईचा आहे, ना स्वातंत्र्यानंतरच्या राष्ट्र उभारणीचा इतिहास आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

तर भाजपचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे, पक्ष शून्यातून उभा राहिला आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. भाजपचा इतिहास काँग्रेससारखा नाही, कॉंग्रेस एका घराच्या जोरावर राजकारण करत आहे, अशी टीका त्यांनी केली.

Tags

follow us