Download App

राजेंद्र पाटणी यांचे निधन; भाजपने विदर्भात चार महिन्यात दुसरा आमदार गमावला

वाशिम : कारंजा विधानसभा मतदारसंघांचे भाजप (BJP) आमदार राजेंद्र पाटणी (Rajendra Patani) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. पाटणी हे दोन ते अडीच वर्षांपासून आजारी होते. त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पाटणी यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शोक व्यक्त केला आहे. (Karanja Assembly Constituency BJP MLA Rajendra Patni passed away due to prolonged illness.)

राजेंद्र पाटणी हे 2004 साली शिवसेनेकडून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश ढहाके यांनी त्यांचा 30 हजार मतांनी पराभव केला होता. पण यानंतरही त्यांनी हार न मानता पुन्हा कामाला सुरुवात केली. 2014 साली पाटणी यांनी भाजपकडून तिकीट घेतले आणि पुन्हा विधानसभा गाठली. 2019 मध्येही पाटणी यांनी 20 हजारांच्या दणदणीत मताधिक्याने विजय मिळविला होता.

पाटणी यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली :

पाटणी यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला. फडणवीस म्हणाले, अत्यंत दुःखद बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे.

पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी पाटणी यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ॐ शांती.. 

follow us