Nagpur News : प्रियकराला नोकरी नसल्याने प्रेयसीच्या घरच्यांनी दोघांच्या लग्नाला नकार दिला. नंतर तिचं लग्न लावून दिलं कुणाशी तर चक्क प्रियकराच्या काकाशीच. दोघांचा संसार सुरळीत सुरू झाला. संसारवेलीवर दोन फुलं उमलली. सुखेनैव सुरू असतानाच अचानक कहाणीत ट्विस्ट आला. लग्नानंतर पुतण्या त्याची प्रेयसी म्हणजे काकूसोबत पळून गेला. काकाला कळल्यावर त्यांनी भरोसा सेल गाठलं. तक्रार दिली. पोलिसांनी पळून गेलेल्यांना शोधलं. तिघांना समोरासमोर बसवून समजावून सांगितलं आणि हा वाद मिटवला. काका-काकूंनी पुन्हा संसार सुरू केला तर पुतण्यानेही त्यांच्या संसारात आणखी काही विघ्न नको म्हणून माघार घेतली.
याबाबत आधिक माहिती अशी, या घटनेतील तरूण आणि 21 वर्षीय तरुणी मध्य प्रदेशातील बालाघाट येथे राहतात. दोघांचेही दहावीपासूनच एकमेकांवर प्रेम होते. दोघांना लग्नही करायचे होते. मात्र, उमेश बेरोजगार असल्याने घरच्यांनी लग्नााल नकार दिला. त्यानंतर तो कामाच्या शोधात नागपूरला आला. येथे एका हॉटेलात त्याला कामही मिळाले. नंतर काही दिवसांनी तो त्याच्या गावी गेला. त्यावेळी मात्र त्या तरुणीच्या घरच्यांनी तिचे लग्न तरूणाच्या काकाशीच ठरवले होते. साखरपुडाही उरकून घेतला होता.
या प्रकारानंतर दोघेही गोंधळून गेले होते. मात्र, कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने शांतच राहिले. यानंतर तरुणाचा काका आणि तरुणीचा संसार सुरू झाला. तरुणी दोन मुलांची आई झाली. सर्व काही सुरळीत सुरू होते. सुखी संसार सुरू असला तरी तरुण आणि तरुणीचे प्रेमसंबंधही सुरुच होते. काका आणि त्याच्या कुटुंबियांना याची काहीच माहिती नव्हती. कोरोनानंतर मात्र काका आणि तरुण नागपुरातील हॉटेलात काम करू लागले. शहरात घर भाड्याने घेतले. या घरात काका काकू आणि पुतण्या (तरुण) एकत्र राहू लागले. यानंतर तरुण आणि तरुणी दोघांनीही प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. यानंतर चिठ्ठी लिहून पळ काढला.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर काका मात्र भेदरून गेला. पत्नी निदान आपल्या मुलांसाठी तरी परत येईल म्हणून वाट पाहिली. आठ दिवसांनंतर मात्र काकाने भरोसा सेलमध्ये तक्रार दिली. त्यानंतर या तक्रारीच्या आधारे भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी दोघांना शोधून काढले. नंतर तिघांनाही समोरासमोर बसवून त्यांना समजावून सांगितले. त्यांचे समुपदेशन केले. तरुणाचीही समजूत काढली. तरुणाच्याही लक्षात आले. त्यानंतर त्याने तडक गाव गाठायचे ठरवले आणि काका-काकूंचा संसार पुन्हा पहिल्यासारखा सुरू झाला.