Bachchu Kadu : राज्यातील राजकारणी मंडळींना आता निवडणुकांचे वेध लागले आहेत. सत्ताधारी महायुतीकडे मोठं संख्याबळाचा दावा केला जात असताना महाविकास आघाडीनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय येण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. या सगळ्या घडामोडींत सत्ताधारी गटातील आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
मागील काही दिवसांपासून बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी केलेल्या काही वक्तव्यातून तसे संकेतही मिळाले होते. त्यामुळे ते सरकारमधून बाहेर पडणार का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. त्यावर स्वतः बच्चू कडू यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार नाही.
Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय कसं मिळालं?; बच्चू कडूंनी गुवाहाटीतला ‘तो’ किस्सा रंगवून सांगितला
आमच्या पक्षाचं भलं कुठं होणार याचा आधी विचार केला जाईल. जिथं आमचं राजकीय अस्तित्व मजबूत होईल तोच आमचा राजकीय सोबती असेल असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. आम्ही एक दोन जागांसाठी काही करणार नाही. तीन ते चार जागा घेऊनच महाविकास आघाडीकडे जाण्याचा विचार करू. नाहीतर तसं करण्यात काहीच अर्थ नाही. निवड करायचीच वेळ आली तर अमरावतीच कशाला. वर्धा, यवतमाळ आणि जळगावही आहे, असे आमदार बच्चू कडू म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. बच्चू कडू ऐनवेळी वेगळा निर्णय घेणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आज शरद पवार-बच्चू कडू यांची भेट होणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज अमरावती दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज बच्चू कडू शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. शरद पवार आज सकाळी बच्चू कडू यांच्या घरी भेट देणार आहेत. बच्चू कडू यांनी स्वागताची तयारीही केली आहे. त्यांच्या घरासमोर मोठे बॅनर लागले आहेत. महायुतीत कडू नाराज असल्याने दोन्ही नेत्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीत दोघांत काय चर्चा होते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
मेक इंडियात कांदा येत नाही का ? भाजप आमदारांसमोरच बच्चू कडू मोदींवर बरसले !