Download App

आमदार नितीन देशमुख कपड्याची बॅग भरून एसीबीच्या दारी; अटकेची शक्यता व्यक्त

अकोला : बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे आज अमरावती एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी अकोल्यातून अमरावतीसाठी रवाना झाले आहेत. त्याआधी नितीन देशमुखांनी मोठं शक्तीप्रदर्शन केल्याचं दिसून आलं. यावेळी देशमुख यांच्या पत्नीनं त्यांचं औक्षण केलं. आपल्याला अचानक अटक झाल्यास गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी आपली कपड्यांची बॅग भरुन नेली आहे. याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्याच्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख अमरावतीच्या एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. यावेळी देशमुखांच्या चौकशीनिमित्तानं मोठं शक्तीप्रदर्शन करुन रवाना झाले आहेत.

आमदार नितीन देशमुख अकोल्यातील त्यांच्या कार्यालयातून अमरावतीकडं निघाले आहेत. त्यांनी त्यांच्यासोबतच कपडे आणि सामान घेतले आहे. अकोल्यातून जवळपास 700 कार्यकर्ते देशमुखांसोबत अमरावतीला निघाले आहेत.

आपल्याला अमरावतीच्या एसीबी कार्यालयात हजर झाल्यानंतर अटक करतील, त्यानंतर आत टाकतील त्या हिशोबानं तयारीलाच लागलो, म्हणून आज घरून कपडे घेऊन सोबत चाललोय. कारण, हुकूमशाही पद्धतीनं सरकार चालू आहे, इंग्रजापेक्षा हे खराब लोक आहेत, असा आरोप देशमुख यांनी यावेळी केलाय.

उद्धव ठाकरे शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांना लाच लुचपत प्रतिबंध कार्यालयाने उघड चौकशी संबंधी जबाब नोंदविण्यासाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. आज 17 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत. नितीन देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. देशमुख यांच्यावर बेहिशेबी संपत्ती असल्याची तक्रार काही महिन्याधी करण्यात आली होती. देशमुख यांच्या संपत्तीची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र अमरावती येथे सुरू आहे.

Tags

follow us