Download App

Akola News : नदीकाठी खेळणं जीवावर बेतलं, दोन चिमुकल्यांचा मृत्यू

अकोला : अकोला जिल्ह्यातील (Akola) बाळापूर (Balapur) शहरातील मन नदीत दोन चिमुकल्यांचा मुलांचा बुडून मृत्यू (death by drowning) झालाय. 7 वर्षीय मोहम्मद नब्बान मोहम्मद फहीम आणि 9 वर्षीय दानियाल मोहम्मद फैय्याज अशी या दोन्ही मृत चिमुकल्यांची नावं आहेत. मृत मुलं ही रविवारी (दि. 29) सायंकाळी मन नदीकाठी खेळत होती. खेळताना अचानक त्यांचा तोल जाऊन पाय घसरला आणि नदीत बुडाली असावीत असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर बाळापूर शहरात एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची (Sudden death) नोंद करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्याच्या बाळापूर शहरातून ‘मन’ नदी वाहते. या नदीच्या काठावर अनेक घरं तसेच वस्त्या आहेत. या परिसरातील अनेक लहान मुलं नदीकाठावर खेळत असतात. रोजप्रमाणं रविवारी सायंकाळी काही मुलं नदीकाठी खेळत होती, यातील दोन लहान मुलांचा पाय घसरल्यानं नदीत बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोन मुलं पाण्यात पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी नदीकाठी धावले आणि नदीत उड्या घेतल्या. नदीत शोधा-शोध केली, मात्र तोपर्यंत त्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. दोघांचेही मृतदेह नदी बाहेर काढले आणि वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्यातील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आलंय.

या दुर्घटनेत 7 वर्षीय मोहम्मद नब्बान मोहम्मद फहीम आणि 9 वर्षीय दानियाल मोहम्मद फैय्याजचा मृत्यू झालाय. दोन्ही मुलांच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी चांगलाच गोंधळ घातलाय. संबंधित प्रशासनाला धारेवर धरलं. कुटुंबियांसह नागरिकांनी बाळापूर पोलीस स्टेशनला धाव घेतली.

यावेळी नागरिकांनी नदीच्या काठावर भिंत उभारण्यासाठी निर्णय घ्यावा, अशी मागणी पोलिसांकडं केली. सध्या तरी बाळापूर पोलिसांनी या प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद झालीय. या घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले घटनास्थळी दाखल झाले.

Tags

follow us