Uddhav Thackeray And Naveent, Ravi Rana : उद्धव ठाकरे कालपासून विदर्भाच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. काल उद्धव ठाकरे दौऱ्यातील पहिल्या दिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री उशिरा अमरावतीत दाखल झाले. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी अमरावतीत लावलेले बॅनर राणा समर्थकांनी फाडले. त्यामुळे अमरावतीतील राजकारण चांगलेच तापले आहे. (Uddhav Thackeray Amravati Visit Naveent, Ravi Rana Poster War)
राणा दाम्पत्याच्या वतीने श्रावणमासाच्यानिमित्ताने सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे बॅनर शहरात लावले होते. पण याबॅनरवर टाकलेल्या मजकू आणि हे बॅनर उद्धव ठाकरेंच्या बॅनर खाली लावल्याने शिवसैनिकांनी ते बॅनर फाडले. त्यानंतर राणा यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर फाडण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर रवी राणांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली असून आतापर्यंत सात ते आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
राणा यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलीसांनी नोटिसा बजावल्या आहेत. नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे की, आपण युवा स्वाभीमानी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहे. 10 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अमरावती दौरा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमादरम्यान आपण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असे कोणतेही गैरकृत्य करु नये. गैरकृत्य केल्यास आपणाविरुद्ध प्रचलित कायद्यान्व्ये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. याकरीता आपणास नोटीस देण्यात येत आहे
उद्धव ठाकरे अमरावतीत येण्यापूर्वी राणा दाम्पत्यांकडून शहरात सोमवारी सामूहिक हनुमान चालिसाचं आयोजन करण्यात आल्याचं बॅनर राणा दाम्पत्याकडून लावण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या स्वागताच्या बॅनरखाली हे बॅनर लावण्यात आल्याने हा वाद वाढण्याचे सांगण्यात येत आहे.