Download App

Hallmarking Rules: हॉलमार्किंगच्या नियमांचं उल्लंघन: एक कोटींचे दागिने जप्त

नागपूर : सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी केंद्र सरकारने हॉलमार्कच्या (Hallmarking) नियमांमध्ये 1 जुलै 2021 पासून नवीन गाईडलाईन लागू केल्या आहेत.

या गाईडलाईननुसार दागिन्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेल्या हॉलमार्किंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर शहरात भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) (Bureau of Indian Standards) कारवाई केली आहे.

बीआयएसनं सहा ठिकाणी केलेल्या छापेमारीत कोट्यवधी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. राज्यात नकली हॉलमार्क लावून सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जात असल्याची माहिती बीआयएसला मिळाली होती.

त्यावरून सहा ठिकाणी टाकलेल्या धाडीत नकली हॉलमार्कचा होलोग्राम असलेले सुमारे 2.75 किलोग्रॅम दागिने जप्त करण्यात आले. बीआयएसने नागपूर, मुंबई, पुणे व ठाणे येथे टाकलेल्या धाडीत नकली हॉलमार्कचा होलोग्राम असलेले सुमारे एक कोटी पाच लाखांचे दागिने जप्त केले.

नागपुरात इतवारीतील सराफा बाजारात एका ठिकाणी काल बीआयएसच्या अधिकाऱ्यांनी छापा घातला. त्या ठिकाणी वर्ष 2021 पासून बंधनकारक करण्यात आलेल्या हॉलमार्किंग च्या नियमांचे उल्लंघन करून जुन्याच पद्धतीने ग्राहकांना सोन्याचे दागिने विकले जात होते. तसेच नियमबाह्य पद्धतीने दागिन्यांवर बीआयएसच्या लोगोसह शुद्धतेचे तपशील नमूद केले जात होते.

रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. त्याशिवाय मुंबईतील प्रसिद्ध झवेरी बाजारात दोन ठिकाणी, मुंबईतील अंधेरीमध्ये एका ठिकाणी, ठाण्यात जांभळी नाक्याजवळ एका ठिकाणी तर पुण्यात रविवार पेठेतील एका ज्वेलर्सवर ही अशीच कारवाई करण्यात आली आहे.

Tags

follow us