Devendra Fadnavis On Ajit Pawar In Condolence Speech : ‘बोलणं कुठून सुरू करावं हेच कळत नाही. मनात प्रचंड वादळ, अशा प्रकारचा शोक प्रस्ताव मांडावा लागेल अशी कल्पनाच केली नव्हती. सभागृहात नजर गेली की दादा खुर्चीत बसलेले दिसायचे. आज मात्र ते आपल्याच नाहीत याची खंत आहे’, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अजित पवारांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. काही वेदना कधीच कमी होत नाहीत, अशीच ही वेदना आहे. अजितदादांनी विविध राजकीय क्षेत्रांना पादाक्रांत केलं. दादांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली म्हणजे काय ते खऱ्या अर्थाने समजलं’, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. दादा वरकरणी जरी कठोर वाटायचे पण ते आतून प्रेमळ होते. अजित पवार महाराष्ट्राला न लाभलेले उत्कृष्ट मुख्यमंत्री होते. भविष्यात त्यांच स्वप्न कधीतरी पूर्ण झालं असतं असेही यावेळी फडणवीस म्हणाले.
दादा कठोर निर्णय घ्यायला मागेपुढे बघत नव्हते
सभागृहात दादा माझ्या शेजारीच बसलेले असायचे. अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यायला दादा मागेपुढे पाहायचे नाहीत. मित्रशोक हा आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो. लाडकी बहीण योजनेनंतर, अजितदादांनी गुलाबी जॅकेट घालायला सुरुवात केली होती. आम्हालाही सगळ्यांना ते जॅकेट घालायला लावलं होतं. आता त्या गोष्टी केवळ आठवणींमध्ये आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दादांमध्ये मुख्यमंत्री बनण्याची क्षमता होती. मात्र, कधी वेळ न चुकवणाऱ्या दादांनी यावेळी आयुष्याची वेळ चुकवली असे सांगत अजित पवार महाराष्ट्राला न लाभलेले उत्कृष्ट मुख्यमंत्री होते. भविष्यात त्यांच स्वप्न कधीतरी पूर्ण झालं असतं असे फडणवीस म्हणाले.
दादा खऱ्या अर्थाने माझे दादाच होते
अजित पवार असते तर बारावा अर्थसंकल्प मांडला असता. दादांचा आणि माझा जन्मदिवस एकाच दिवशी असतो. दादा खऱ्या अर्थाने माझे दादाच होते. २०१४ नंतर दादांशी आमचं भावनिक नातं निर्माण झालं. दादांशी आमचं केवळ स्ट्रॅटेजिक नातं नव्हतं तर भावनिक नातं होतं. दादांचं काम हे १० ते १५ मिनाटांचं असायचं. कुठलंही काम कागदावर असायचं, काय बोलायचं ते लिहिलेलं असायचं’, असे फडणवीसांनी आठवणींचा उजाळा देताना सांगितले. कुठल्याही मुख्यमंत्र्याला अर्थमंत्री कसा पाहिजे तर, तो अजितदादांसारखा पाहिजे की जो तुम्हाला नेहमी वास्तविकतेचा आऱसा दाखवले पण त्याचवेळी राज्याची वाटचाल थांबवणार नाही असेच दादा होते.
विरोधीपक्ष नेता असताना दादा मला मुख्यमंत्री म्हणायचे
मी विरोधी पक्षनेता असताना दादा माझा मुख्यमंत्री असा उल्लेख करायचे. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता आहे याची त्यांना आठवण करुन द्यायला लागायची असे फडणवीसांनी सांगितले. अजितदादांच्या स्वभावात पारदर्शकता होती. त्यांच्या पोटात होतं तेच ओठावर यायचं. ते रोखठोक बोलायचे. काम होऊ शकत असेल ते काम दादा तात्काळ करायचे. वर्षानुवर्षे काम करताना दादांनी एकवचनी असल्याचा लौकिक राखला असे फडणवीस म्हणाले.
दादा उपस्थित नाही म्हणून निर्णय झाला नाही असे…
दादांना हळदीचं दूध प्यायला आवडायचं. दादांचा वक्तशीरपणा ही त्यांची सर्वोत्तम सवय होती. कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळेआधी दादा पोहोचायचे. १२ वाजताच्या कार्यक्रमाला दादा ११.५९ला यायचे. मंत्रालयात दादा कोणत्याही कर्मचाऱ्याआधी पोहोचायचे. दादा उपस्थित नाहीत म्हणून निर्णय झाला नाही, असं झालं नाही’, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
