Vijay Vadettivar on Government for Santosh Deshmukh Murder : बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडसह राज्याचं राजकारण तापलं आहे. या हत्येमागे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांसह विरोधकांकडूनही केला जात आहे. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सरकारला फैलावर घेतले आहे.
गेल्या अनेक दिवसांत कट्टर विरोधक म्हणून वावरणारे धस अन् पंकजा मु्ंडेंचा एकाच गाडीत प्रवास
मुंबईत पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवरच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. सत्ताधारी आमदार प्रश्न उपस्थित करत असताना याची चौकशी करू इतके औदार्य सरकार दाखवत नाही. याचा अर्थ तुम्हीही काहीही करा, कितीही आरोप झाले तरी कारवाई होणार नाही. अशी बेशरमीची भूमिका सरकारने घेतल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. संतोष देशमुख प्रकरणात आरोपी विष्णू चाटे याचा फोन अजूनही का सापडत नाही, महाराष्ट्र पोलीस इतके कमजोर झाले आहेत का की एक मोबाईल त्यांना शोधता येत नाही? हा मोबाईल सापडला की दूध का दूध पानी का पानी होईल असं वडेट्टीवार म्हणाले.
‘आम्ही भेटतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो, आमचे संबंध…’; CM फडणवीसांच्या मनात नक्की काय?
पुढे बोलताना ते म्हणाले, मंत्रालयात प्रवेशासाठी आता चेहरा पडताळणीची नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. त्यामुळे ही व्यवस्था बंद करण्यात यावी ही मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तालुका किंवा जिल्हा पातळीवर प्रश्न सुटले नाहीतर सामान्य जनता मंत्रालयात मंत्री, सचिव यांना भेटण्यासाठी, आपल्या व्यथा मांडण्यासाठी येतात. पण महायुती सरकारला जनतेची भीती का वाटते? मंत्री,सत्ताधारी आमदार यांच्या जवळचे कंत्राटदार, दलाल यांना मंत्रालयात सहज प्रवेश मिळतो पण शेतकरी, मजूर , सामान्य जनतेला मात्र प्रवेश करता येऊ नये अशी व्यवस्था उभी केली आहे हे अन्यायकारक असल्याने ही व्यवस्था बंद करण्यात यावी अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली.
एकीकडे धान, सोयाबीन शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. शेतकरी ठिबक सिंचनाचे अनुदान थकले आहे, मनरेगाचे गेले सहा महिने पैसे दिले नाही त्यामुळे गडचिरोली मध्ये कामगाराने आत्महत्या केली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना देखील भत्ते दिले गेले नाही.त्यांना सावत्र वागणूक दिली जात आहे. राज्य सरकार कंगाल झाल्याने सर्व घटकांवर अन्याय केला जात आहे अशी टीका ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यातील अश्या अनेक मूलभूत प्रश्नावर लक्ष हटवण्यासाठीच मंत्र्यांमध्ये मतभेद, वाद असे चित्र निर्माण करत असल्याचे ही वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.