सत्तेतील आमदार असलात तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करा; विखेंचा आमदार लंघेंना सल्ला

प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यास घाबरू नये, असा सल्ला डॉ. सुजय विखे पाटील यांनी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांना दिला.

Untitled Design   2026 07 27T101513.924

Untitled Design 2026 07 27T101513.924

Vikhe’s advice to MLA Langhe : अधिकारी जनतेची कामे वेळेत करत नसतील, तर सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यास घाबरू नये, असा स्पष्ट सल्ला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांना दिला. सत्ता आणि पदापेक्षा जनता मोठी असून, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्यासाठीच असतात, असे प्रतिपादन त्यांनी केले.

नेवासा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानाचा शुभारंभ यावेळी मान्यवरांचा उपस्थितीत करण्यात आला. त्या आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, अधिकारी काम करत नसतील, तर आंदोलन करा. तुम्ही सत्तेत असलात, महायुतीचे आमदार असलात तरी लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यास मागे-पुढे पाहू नका. तुम्ही आंदोलन केले तर मी स्वतः तुमच्यासोबत येईन. माझे वडील पालकमंत्री असले तरी मी जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनात सहभागी होईन. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे जनतेची कामे करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले की, पूर्वी ज्या पद्धतीने काम चालत होते, ती कार्यपद्धती आता बदलण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य नागरिकांशी सन्मानाने वागावे, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे आणि त्यांना शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारायला लावू नयेत. जनतेला तुमची खुर्ची किंवा गाडी नको आहे, त्यांना वेळेत न्याय आणि सन्मानाची वागणूक हवी आहे, असे ते म्हणाले.

MPSC औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीचा संशय, उमेदवारांनी डिजिटल पुराव्यांसह दाखल केली लेखी तक्रार

पुढे बोलताना ते म्हणाले की नेवासा तालुका गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसून, महिलांवरील अत्याचार, बलात्कार, खून यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. गुन्हेगारांच्या मतांसाठी तत्त्वांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचबरोबर शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना दिलासा मिळत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पदापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची असल्याचे सांगितले. पद मिळविण्यापेक्षा गरिबांचे प्रश्न सोडविणे हेच सर्वात मोठे कार्य आहे. समाजसेवा करणाऱ्यालाच जनता कायम साथ देते,असे सांगत पदाच्या राजकारणात न अडकता जनतेची कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नेवासा तालुक्यातील रस्ते, जमीनविषयक वाद आणि महसूल प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी महसूल प्रशासनाने घटनास्थळी जाऊन निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अधिकारी काम करत नसतील, तर लोकप्रतिनिधींनीही जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यास मागे-पुढे पाहू नये. सत्ता नव्हे, तर जनता मोठी असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version