MPSC औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीचा संशय, उमेदवारांनी डिजिटल पुराव्यांसह दाखल केली लेखी तक्रार
दोन उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली आहे.
Suspicion of paper leak in MPSC Drug Inspector recruitment : देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेवर देखील गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत दोन उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे.
तक्रारीनुसार, 22 मार्च 2026 रोजी झालेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हाट्सअँपवर व्हायरल झाली होती. याशिवाय काही उमेदवारांचे गुण संशयास्पद पद्धतीने वाढवल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. गुणपत्रिका आणि अंतिम निवड यामध्ये विसंगती असल्याचा दावा तक्रारदारांनी केला असून, संबंधित व्हाट्सअँप चॅट, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या आरोपांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, औषध निरीक्षक भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. प्राप्त झालेल्या तक्रारीतील तथ्यांची पडताळणी केली जाईल आणि आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
रक्षकच बनले भक्षक! पुण्यात तोतया पत्रकार, महिला पोलिस आणि पोलिस नाईक यांचा एक कोटींच्या दरोड्याचा कट
या प्रकरणावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करत म्हटले की, एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षा हा फक्त एका प्रश्नपत्रिकेचा विषय नसून हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न आहे. परीक्षेपूर्वी काही उमेदवारांकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध नसल्याच्या चर्चेमुळे परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. जर हे आरोप खरे ठरले, तर तो केवळ पेपरफुटीचा प्रकार नसून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासाला धक्का देणारा प्रकार असेल.
MPSC औषध निरीक्षक परीक्षा हा केवळ एका पेपरचा प्रश्न नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे..!
आज MPSC औषध निरीक्षक परीक्षेबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. परीक्षेपूर्वी काही उमेदवारांकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा प्रकार समोर येत आहे. जर हे सत्य… pic.twitter.com/a13HGxZhKR
— Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) (@MahebubShaikh20) July 26, 2026
मेहबूब शेख यांनी पुढे म्हटले की, एका प्रश्नपत्रिकेमागे हजारो विद्यार्थ्यांची अनेक वर्षांची मेहनत, पालकांचे कष्ट, त्याग आणि उज्वल भविष्याची स्वप्ने दडलेली असतात. काही मोजक्या लोकांच्या गैरप्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ होऊ नये. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक राहावी आणि एमपीएससीवरील जनतेचा विश्वास कायम टिकून राहावा, यासाठी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
तसेच उपलब्ध असलेली सर्व माहिती आणि पुरावे संबंधित यंत्रणांना देण्यास आम्ही तयार आहोत. दोषी कोणताही असो, त्याला कोणतेही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण न देता कठोर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थी कोणतीही सहानुभूती मागत नाहीत, तर त्यांच्या कष्टाला न्याय मिळावा, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. एमपीएससीवरील विश्वास टिकवायचा असेल, तर या प्रकरणातील सत्य बाहेर येणे आणि सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.