Water delivered to elderly at doorsteps during drought Gram Panchayat peon’s act of social service in Marathwada :
सध्या जालना जिल्ह्यात दुष्काळ आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलाय. तर याच दुष्काळी परिस्थितीत हाताला काम नसल्यानं अनेकांनी स्थलांतर केल्यानं खेड्या पाड्यात घरात केवळ वृद्ध उरलेत. अशाच वृद्धांना घरपोच पाणी देण्याचं काम एक ग्रामपंचायत शिपाई आणि त्याची पत्नी करतीय. बघूया जालन्यातील डोमेगावमधील ग्रामपंचायत शिपाई बाबासाहेब शेळके यांच्या समाजसेवेवरचा हा स्पेशल रिपोर्ट.
जालना जिल्हा दुष्काळाने होरपळून निघालाय. पाण्याअभावी पीक वाया गेलंय. डोमेगावात विहिरी आटल्यात तर काहींचा पाणीसाठा तळाला गेलाय. खरीप पीक वाया गेल्यानं गावातील अनेक जणांनी हाताला काम मिळण्यासाठी गावातून बाहेरगावी स्थलांतर केलंय. त्यामुळे घरा-घरात केवळ वृद्ध माणसं उरलीयत.यापैकी कुणी आजारी आहे. तर कुणाचं वय जास्त झाल्यानं हात-पाय चालत नाही. गावात नळाला पाणी आलं तरीही ही वृद्ध माणसं पाणी भरू शकत नाही अशी त्यांची अवस्था आहे. अशा परिस्थितीत या वृद्धांना डोमेगावचे ग्रामपंचायत शिपाई बाबासाहेब शेळके आणि त्यांच्या पत्नी सविता शेळके तारणहार ठरलेत. कारण याच दाम्पत्याने गावतील 45 वृद्ध दाम्पत्यांना बोअरवेल वरून नळ कनेक्शन काढून देऊन घरपोच पाणी तर दिलंच पण याच वृद्धांच्या घरी जाऊन बाबासाहेब आणि सविता शेळके पाणी भरून देतायत.
पुणे कोर्ट गोळीबाराच्या थरारात दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमधून ताब्यात
ऐन म्हातारपणात गावातील 45 घरातील वृद्ध दाम्पत्यांना नळाला पाणी आलं तरी भरण शक्य नाही.जास्त हालचालही करता येत नाही.अशा परिस्थितीत बाबासाहेब आणि सविता शेळके यांनी गावातील वृध्दांसाठी घरपोच पाणी देणं सुरु केल्यानं हे दाम्पत्य डोमेगावात चर्चेचा विषय ठरलंय.त्यामुळे या दाम्पत्यांला अनाथांचा नाथ म्हणून ओळखलं जाऊ लागलंय. सध्या या वयोवृद्धांच्या घरात दुष्काळामुळे कुणीही उरलेलं नाही.अशा परिस्थितीत त्यांना घरपोच पाणी दिल्यानं आम्हांला त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळत असल्याची भावना बाबासाहेब आणि सविता शेळकेनी व्यक्त केलीय.
दुष्काळानं यंदा अनेक कुटुंबांना एकमेकांपासून तोडलंय.संसाराचा गाडा व्यवस्थित चालवण्यासाठी अनेकांनी गाव सोडलंय.त्यामुळे खेड्या-पाड्यात हात पाय देखील वळवू न शकणाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांवर एकटं राहण्याची वेळ आलीय.अशा परिस्थितीत डोमेगावच्या बाबासाहेब आणि सविता शेळकेंनी या वयोवृद्धांच्या घरी जाऊन घरपोच पाणी देण्याची घेतलेली जबाबदारी निश्चितच कौतुकास्पद आहे हे नक्की.
