Radhakrishna Vikhe Patil : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी व सीना प्रकल्प लाभक्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बुधवार, ५ ऑगस्ट २०२6 रोजी सकाळी ११.३० वाजता कर्जत येथील कुळधरण रोडवरील शिवपार्वती मंगल कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीस कुकडी व सीना प्रकल्प लाभक्षेत्रातील शेतकरी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, प्रकल्पाशी संबंधित विविध प्रश्न, सिंचन व्यवस्था, कालव्यांची दुरुस्ती तसेच लाभक्षेत्रातील विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. यापूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सकाळी ९.३० वाजता राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्यानंतर होलेवाडी, चिलवडी आणि कोळवाडी परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कालव्यांच्या दुरुस्तीच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या भेटी दरम्यान शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यावर आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे.
तसेच सकाळी ११.३० वाजता कर्जत येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीस प्रशासकीय मान्यता मिळाल्याबद्दल बार कौन्सिलच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर ते कर्जत येथील ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतील. यानंतर शिवपार्वती मंगल कार्यालयात आयोजित कुकडी व सीना प्रकल्पाच्या आढावा बैठकीत सिंचन, कालवा दुरुस्ती, पाणी वितरण, प्रलंबित कामे आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी मोठा निर्णय ; भारतीय संघात 4 नवीन खेळाडूंचा समावेश
या बैठकीस प्रकल्प लाभक्षेत्रातील सर्व शेतकरी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
