पुणेः फुकटात काजू कतली दिली नाही म्हणून मिठाईच्या दुकानात गोळीबार करण्याचा प्रयत्न झालाय. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे दोन दिवसांपूर्वी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त करण्यात आलेत.
सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील मुख्य रस्त्यालगत एका स्वीट मॉलमध्ये सोमवारी दोन तरुण आले. त्यांनी एक किलो काजू कतली घेतली. मात्र दुकानदाराने पैसे मागितल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्या तरुणांनी त्या दुकानदारावर गावठी पिस्तूल रोखून गोळी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी बाहेर आली नसल्याने त्या तरुणांनी पुन्हा गोळी झाडली. मात्र गोळी दुकानातच पडली. या सर्व गोंधळात त्या ठिकाणी गर्दी जमल्याचे पाहून आरोपी पळून गेले.
याप्रकाराकडे दुकानदाराने गांभीर्याने न पाहता खेळण्यातील बंदूक समजून, त्या घटनेकडे दुर्लक्ष केले. मात्र हा प्रकार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांना समजल्यानंतर त्यांनी घटनेचे पूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच दुकानात बंदुकीतून पडलेली गोळी तपासल्यावर ती खरी असल्याचे लक्षात आले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि एका अल्पवयीन मुलाससह आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.