Download App

शिर्डीतील यात्रेतील पाळणा कोसळला, चारजण जखमी

अहमदनगर : शिर्डी (shirdi) येथील रामनवमी निमित्त भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये एक दुर्घटना घडली आहे. या यात्रेतील एका पाळणा कोसळल्याने चारजण जखमी झाले आहे. दरम्यान या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना साईबाबा रुग्णालयात (Saibaba Hospital) दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेतील जखमींची जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दूरध्वनीवरून विचारपूस केली आहे. तसेच जखमींवर तातडीने उपचार करण्यात याव्या अशा सूचना पालकमंत्री विखेंनी रुग्णालयाला दिल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, शिर्डी येथे रामनवमी निमित्त यात्रा भरवण्यात आली होती. या यात्रेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक देखील आले होते. यावेळी यात्रेतील एका पाळण्यात लोक बसली होती. मात्र अचानक हा पाळणा कोसळला व या अपघातात चारजण जखमी झाले. ही घटना शनिवार, १ एप्रिल रोजी सायंकाळी ८.३० वाजता घडली आहे.

या घटनेत चार जण जखमी झाले आहेत‌. या घटनेत ज्योती किशोर साळवे, किशोर पोपट साळवे यांना जास्त दुखापत झाल्याने त्यांना अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे. भुमिका साबळे‌ ही किरकोळ जखमी असून प्राथमिक उपचारानंतर तिला घरी पाठविण्यात आले. प्रविण आल्हाट यांना‌ही किरकोळ जखम झाली आहे.

दरम्यान या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर साईबाबा रूग्णालयातील वैद्यकीय उपसंचालक डॉ.प्रितम वडगावे यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे व खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे यांच्याकडून दूरध्वनीवरून घटनेची माहिती घेतली आहे.

शिर्डीच्या साईमंदिरात 3 दिवसांत 4 कोटींची देणगी जमा

पालकमंत्र्यांनी डॉ.प्रितम वडगावे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधला असून जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पाळणा निखळून पडण्याच्या घटनेनंतर सर्व पाळणे बंद‌ करण्यात आले असल्याचे ही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Tags

follow us