अहमदनगर : यंदा नगर जिल्ह्यासह राज्यात मान्सूनने पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले. अत्यल्प पावसामुळे अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. मात्र डोंगर माथ्यावर झालेल्या पावसामुळे नगर जिल्ह्यासाठी दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. नगर जिल्ह्यातील महत्वाचे मानले जाणारे भंडारदरा धरण (Bhandardara Dam)हे शंभर टक्के भरलं आहे.
सलग चार वर्षे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे सर्वच धरणेही ओव्हरफ्लो झाली होती. मात्र यंदा जून महिन्यात दोन्ही नक्षत्रे कोरडी गेली. त्यामुळं यंदा धरणे भरतील की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून झालेल्या पावसाच्या आगमनाने जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे.
नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात सध्या जरी पावसाचा जोर ओसरला असला तरी गेल्या दोन दिवसांमध्ये धरणात नव्याने 451 दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा 10974 दलघफू (99.4 टक्के) झाला आहे. रात्री उशिरा या धरणातील पाणीसाठी हा 11000 दलघफूच्या पुढे सरकला होता. दरम्यान, आढळा धरणही पूर्ण क्षमतेने भरले झाले आहे.
सोळा गावांना वरदान ठरणारे आढळा भरले
अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्यातील 16 गावांना वरदान ठरणारे देवठाण (ता.अकोले) येथील आढळा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरुन सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. यामुळे हंगामात पहिल्यांदाच आढळा नदी प्रवाही झाल्याने लाभक्षेत्रासह पाणलोटात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाचे पुनरागमन
यावर्षी सुरुवातीला पावसाने दीर्घकाळ प्रतीक्षा करायला लावली. त्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या. मात्र, पुन्हा पाऊस गायब झाल्याने खरीप पिके जळून गेली. आता गुरुवारपासून (ता.7) पावसाचे पुनरागमन झाल्याने 1060 दशलक्ष घनफूट क्षमता असणारा आढळा जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन दिवस पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातसह महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं आता पुन्हा पावसाने धोर धरल्यास भंडारदरा धरणारतून ओव्हर फ्लो सुरू होण्याची शक्यता आहे.