अहमदनगर : अहमदनगर शहरात सीना नदीचे (Sina River) पात्र सुमारे १३ किमीचे असून यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ आता जलसंपदा विभागाच्या (Department of Water Resources) वतीने काढण्यात येणार असल्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला असल्याचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी सांगितले.
मुंबई येथे मंत्रालयात ऑनलाइन झालेल्या या बैठकीत हा निर्णय झाला. सीना नदीच्या पात्रातील मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ आता जलसंपदा विभाग त्यांच्या कडील मशिनरी देवून काढणार आहे. या मशिनरी करिता लागणारे इंधन हे जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. हा निर्णय झाल्याने अहमदनगर शहरतील सीना नदीची पुर नियंत्रण रेषा ही स्थलांतरित होईल. हा निर्णय नगर शहरासाठी अत्यंत महत्वाचा असून यामुळे पुराचे पाणी नगर शहरात येणार नाही. पर्यायाने नागरिकांचे होणारे मोठे आर्थिक नुकसान हे टाळले जाईल.
Video : राष्ट्रवादीच्या टीझरने विरोधकांची धाकधूक; ‘आपलं नाणं खणखणीत, भल्याभल्यांचा आवाज बंद करणार’
नगर शहरातील नागरिक तसेच व्यापारी यांनी या संदर्भात वेळोवेळी मागणी केली होती. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या बाबत पाठपुरावा केला. दरम्यान, आज मंत्रालयात याबाबत बैठक संपन्न झाली. या बैठकीत हा गाळ काढण्यासाठी जलसंपदा अंतर्गत यांत्रिक विभागाला इंजिनियर, मनुष्यबळ व यंत्र सामुग्री पुरवण्याचे आदेश दिले. याबरोबरच यांत्रिकी विभागास लागणारे इंधन हे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांना आदेशित केले आहे.
याबाबत खा. विखे यांनी सांगितले की, या निर्णयामुळं नदीचे खोलीकरण व रुंदीकरण होणार आहे. नदीतून काढण्यात आलेला गाळ हा पुन्हा या नदी पात्रात येणार नाही अशा पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. या निर्णयामुळं नगरकरांना दिलासा मिळाला आहे. एवढंच नाही तर या परिसरातील पूर रेषा आता स्थलंतरित होणार असल्याचे ते म्हणाले.
शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांचा पाठपुरावा
दरम्यान महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पूर नियंत्रण रेषेबाबत पुर्न सर्वेक्षण व्हावे यासाठी शेतकरी व बांधकाम व्यावसायिक यांच्यासह वेळोवेळी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी मागण्याचे निवेदन दिले होते. या संदर्भात कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला होता, या पाठपुराव्यांतर नामदार विखे पाटील यांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, याच आश्वासनाची या निमित्ताने पूर्तता केली आहे.