Ruchesh Jayavanshi : सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Collector Ruchesh Jayavanshi) यांची काल तडकाफडकी बदली झाली असून सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी (Jitendra Dudi) यांची जयवंशी यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचा कार्यक्षम जिल्हाधिकारी पुरस्कार (Efficient Collector Award of State Govt) मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत राज्य सरकारने जयवंशी यांची बदली केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Hasty transfer of Satara Collector Ruchesh Jayavanshi)
शेखर सिंह यांच्या जागी जुलै 2022 मध्ये रुचेश जयवंशी यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. सर्वसामान्यांच्या समस्या समजून घेणारा अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पश्चिम भागातील महाबळेश्वर, पाचगणी, कास येथील बेकायदा बांधकामे आणि मॅप्रो गार्डनबाबत त्यांनी कठोर भूमिका घेतली होती. त्यांनी घेतलेल्या कठोर आणि ताठर भूमिकेमुळे राजकीय लोकांमध्ये त्यांच्याविषयी नाराजीचा सूर होता. हीच राजकीय नाराजी जयवंशी यांनी भोवली. त्यामुळं त्यांची तडकाफडकी बदली झाल्याची जिल्हात चर्चा आहे.
दहावी, बारावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; वनरक्षक पदाच्या 2138 जागांसाठी भरती
गेल्या 15 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जयवंशी पुढाकार घेतला. जिल्ह्यातील जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे ते जनतेमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांनी सन्मानितही केलं. त्यांना दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारचा कार्यक्षम जिल्हाधिकारी पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अवघ्या 48 तासांच्या आत जयवंशी यांची बदली केल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्यावर नाराज असल्याचीही चर्चा साताऱ्यात आहे.
राजकीय दबावाने रुचेश जयवंशी यांची बदली करण्यात आल्यानं जिल्ह्यात नाराजीचा सूर उमटला आहे. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी या बदलीला जाहीरपणे विरोध करत असल्याचे सांगितले. महाबळेश्वरमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिम आणि शहरातील अतिक्रमणांवर पडणारा हातोडा याचाच लोकप्रतिनिधी धसका घेतल्यानं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या तडकाफडकी बदली करणाऱ्या मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध करत सुशांत मोरे यांनी सांगितले.
नवे जिल्हाधिकारी कोण?
दहा वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने बुधवारी जाहीर केले. सांगली जिल्हा परिषदेचे प्रमुख जितेंद्र डुडी यांची साताऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जितेंद्र डुडी हे मूळचे जयपूर (राजस्थान) येथील असून ते 2016 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सुरुवातीला ते झारखंडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त होते. केंद्र सरकारचे सहायक सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 2018 मध्ये त्यांची केंद्र सरकारने महाराष्ट्र केडरमध्ये नियुक्ती केली. पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे जिल्हा दंडाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.