लष्करात भरती होण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. त्यासाठी ते दिवसरात्र मेहनत करत असतात, अभ्यास आणि व्यायाम करुन शरीराला तयार करत असतात. अशात अग्निवीर योजनेमुळे तरुणांचे हे स्वप्न साकार होण्यास मदत होते. पण या स्वप्नांचा काही जण गैरफायदा देखील घेतात. अशा तरुणांना लष्कर भरतीचे आमिष दाखवून बनावट कॉल लेटर देऊन आर्थिक फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडली आहे.
बनावट गणवेश घालून तोतयागिरी :
लष्कर भरतीचे बनावट कॉल लेटर असलेले चार जण भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडले. आदर्श नांगेलाल कुशवाह (वय 19, रा. रात्योरा, जि. प्रयागराज, राज्य. उत्तर प्रदेश), मोहित कुमार माणिकलाल यादव (वय 25, रा. कासीमाबाद, जि. प्रयागराज, राज्य उत्तर प्रदेश), आनंद श्याम नारायण शर्मा (वय 23, रा. सडवा, जि. प्रयागराज, राज्य उत्तर प्रदेश), अंशू राजेंद्रकुमार तेजपाल सिंह (वय 25, रा. मांझीगाव, जि. प्रयागराज, राज्य उत्तर प्रदेश) यांच्याकडे बनावट कॉल लेटर आढळून आले. त्यांच्याकडे पोलिसांनी अधिक तपास केला.
या चारही जणांना नोकरी लावून देण्यासाठी साडेसात लाख रुपये दोन आरोपींनी घेतल्याची माहिती मिळाली. त्यानुसार लोकेशकुमार तेजपाल सिंह (वय 25, रा. मिर्झापूर, जि. गौतमबुद्ध नगर, राज्य उत्तर प्रदेश) व गोपाळ रामकिसन चौधरी (वय 20, रा. सिखरणा, जि. अलिगढ, राज्य उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली. यातील लोकेशकुमार हा लष्कराचा बनावट गणवेश घालून तोतयागिरी करताना आढळून आला. सहाही आरोपींना पोलिसांनी भारतीय लष्कराची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटक केली. अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.