Download App

प्रणिती शिंदेंच सोलापूर लोकसभेच्या उमेदवार! सुशीलकुमार शिंदेंनी दसऱ्यादिवशी केली अधिकृत घोषणा

Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे. नेतेमंडळींकडून मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. त्यात आता सोलापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील मला जे करता येईल ती मदत मी करणार, असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

माजी मंत्री शिंदे यांनी आज सोलापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांवर भाष्य केले. मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील. मला जे करता येईल ती मदत मी करणार आहे, असे शिंदे यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. मात्र, शिंदे यांच्या वक्तव्यावर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Sanjay Raut : ‘हा तर डुप्लीकेट लोकांचा डुप्लीकेट मेळावा’; राऊतांचा शिंदेंना खोचक टोला

2019 मध्ये सुशीलकुमार शिंदे पराभूत 

सध्या सोलापूर मतदारसंघात भाजपाचे डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत शिवाचार्य यांनी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. शिंदे यांनी त्याचवेळी ही माझी शेवटची निवडणूक आहे असे जाहीर केले होते. मात्र तरीही या निवडणुकीत शिंदे यांना विजय मिळवता आला नव्हता. आता शिंदे स्वतः उमेदवार नसतील. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे यांचे नाव पुढे केले आहे. अद्याप जागावाटप झालेले नाही. मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठी या मतदारसंघाबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us