आनंदाची बातमी! आता विठुरायाचं दर्शन फक्त दोन तासांत; जाणून घ्या, सविस्तर..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुपतीच्या धर्तीवर विठुरायाच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.

pandharpur

pandharpur

Pandharpur Vitthal Rukmini Mandir Darshan : पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ भाविकांना नेहमीच असते. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशीला तर पंढरपुरात भाविकांचा जनसागर उसळतो. अन्य दिवशीही पंढरपुरात भाविक भक्तांची मांदियाळी असतेच. अनेकांना विठुरायाचं दर्शन मिळतं पण अनेक जण असे असतात त्यांना दर्शन काही घेता येत नाही. कुणी विठुरायाच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन माघारी फिरतो. आता या भक्तांच्या मनाची विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची इच्छा सरकारने जाणली आहे. भाविकांना रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी होऊन फक्त दीड ते दोन तासांत दर्शन घेता येईल अशी खास व्यवस्था प्रशासन थोड्याच दिवसांत करणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुपतीच्या धर्तीवर विठुरायाच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक असणारा दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभारणीसाठी राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीने ग्रीन सिग्नल दिला आहे. पंढरीच्या पांडुरंगांच्या दर्शनासाठी भाविक भक्तांना आता फार काळ रांगेत राहावं लागणार नाही. फक्त दोन तासांत दर्शन होईल अशी सुविधा राज्य सरकार करणार आहे. यासाठी राज्य सरकारने 110 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. महिन्याभरात कामाला सुरुवात होईल.

पंढरपूर येथे एक हजार खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय मंजूर; आरोग्यमंत्री सावंत यांची माहिती

असं आहे दर्शनाचं प्लॅनिंग

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी गोपाळपूर पत्राशेड येथे चार मजली अद्ययावत दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. या ठिकाणाहून मंदिरापर्यंत येण्यासाठी 1050 मीटर लांबीचा स्कायवॉक उभारण्यात येईल. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन टोकन घ्यावे लागेल. टोकन दिलेल्या वेळेच्या आधी अर्धा तास भाविकांना या कक्षात पोहोचावे लागेल. यानंतर फक्त दीड ते दोन तासांत पायी चालत जाऊन भाविकांनी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेता येईल.

कोणत्या सुविधा असणार?

याठिकाणी दर्शन रांगेत भाविकांसाठी पिण्याचे पाणी, वेटिंग हॉल, दर्शनासाठी टोकन घेण्याची सुविधा, रिफ्रेशमेंट, आपत्तीतून बाहेर पडण्याची व्यवस्था, हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी सुविधा, पोलीस बंदोबस्त, भोजनाची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पांडुरंगाच्या सेवेचं फळ मिळालं : अजितदादांच्या आईनं पंढरपूरमध्ये जाऊन घेतलं दर्शन

 

Exit mobile version