पुणे : पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाच्या (MPSC Student Protest) ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मध्यरात्री भेट दिली. यावेळी शरद पवार थेट विद्यार्थ्यांमध्ये सामील झाले आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली. एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या या योग्यच असून आपण त्यांच्या पाठिशी आहोत, असे म्हणत शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा देत प्रश्न सोडण्याचं आश्वासन दिलं.
यावेळी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, “एका विद्यापीठाचे कुलगुरू मला काल भेटायला आले होते. त्यांनी एमपीएससीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठातील विद्यार्थी हे याच्याविरोधात गेल्या 26 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. याचा परिणाम विद्यापीठाच्या कामावर होत आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असून आपण मुख्यमंत्र्याची या प्रकरणी भेट घेऊन एक बैठक घ्या. अशा प्रकारचं लेखी निवेदनही त्यांनी दिलं. या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि येत्या दोन दिवसात यासंबंधी एक बैठक घेण्याचं आश्वासन दिलं.”
धारावीत भीषण आग, 25 घरं जळून खाक
विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी एका शिष्टमंडळाने आपल्यासोबत यावं असंही शरद पवारांनी सांगितलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत एमपीएससीचे अध्यक्ष आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित असतील, त्यामुळे तुमची बाजू मांडणं आवश्यक आहे असंही शरद पवार म्हणाले.
पुण्यात सुरु असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची स्वत: शरद पवार यांनी दखल घेतली. ते रात्रीच्या अकरा वाजता आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांची मागणी पूर्ण करणार, असं आश्वासन दिलं.
शरद पवारांनी केलेल्या आवाहनानंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी पाच जणांचं शिष्टमंडळ हे शरद पवारांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहे. या शिष्टमंडळात कोण असणार याची नावंही विद्यार्थ्यांनी जाहीर केली.
यावेळी शरद पवारांना विद्यार्थ्यांनी जागा करून दिली आणि शरद पवार विद्यार्थी आंदोलनच्या मधोमध पोहोचले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना खुर्ची देऊ केली पण पवारांनी ती नाकारली आणि उभं राहून संवाद साधला.