Download App

नीम थापा-राज तिवारी ‘Nagar Rising Half Marathon’चे विजेते; अडीच हजार स्पर्धकांचा सहभाग

अहमदनगर : महाराष्ट्रातील नावाजलेली आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन (Nagar Rising Half Marathon) स्पर्धा आज (रविवारी) मोठ्या उत्साहात झाली.

या स्पर्धेत २१ किलोमीटर प्रकारात नीम थापा, राज तिवारी यांनी तर १० किलोमीटर प्रकारात महादेव घुगे, दीपचंद भारती व विशाखा भास्कर यांनी आपल्या गटात विजेतेपद मिळविले.

नगर रायझिंग फाउंडेशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत अडीच हजार धावकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या हस्ते जल्लोषात झाले. 

स्पर्धेत १० किलोमीटर मॅरेथॉनचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी, २१ किलोमीटर मॅरेथॉनला शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनच्या अध्यक्ष आशाताई फिरोदिया व अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष छायाताई फिरोदिया यांनी तर ४ किलोमीटरच्या मॅरेथॉनला बेगॉस संस्थापक प्रियंका काबरा व हेमंत काबरा यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. 

यावेळी नगर रायझिंग फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, स्पर्धेचे मुख्य संयोजक संदीप जोशी आदी उपस्थित होते. 

ही मॅरेथॉन स्पर्धा २१ किलोमीटर, १० किलोमीटर व ४ किलोमीटर अशा तीन प्रकारांत झाली. सहभागी स्पर्धकांना टी शर्ट, चेस नंबर, भेट वस्तू व पदक देण्यात आले. या स्पर्धेसाठी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व मॅक्सिमस स्पोर्टस अॅकॅडमी हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते.

तर आय लव्ह नगर, सुहाना मसाले, बेगॉस, सी.टी. पंडोल अॅण्ड सन्स, चितळे बंधू, हेमराज केटर्स हे सह प्रायोजक होते. प्रसाद बेडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ. सतीश सोनवणे, अॅड. गौरव मिरीकर, डॉ.श्याम तारडे जगदीप मकर, सचिन राणे, रितेश खंडेलवाल, रितेश नय्यर, उमेश गांधी, कार्तिक नायर, प्राची पवार, अभिनंदन भनसाळी आदींचे सहकार्य मिळाले.

यांनी वेधले लक्ष
दिव्यांग (अंधत्व) असलेले अमरजितसिंग चावला हे २१ किलोमीटर तर ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी १० किलोमीटर प्रकारात सहभाग घेतला. दोघांनी अंतराची शर्यत पूर्ण केली.

अमरजितसिंग चावला यांची ही १५३वी मॅरेथॉन स्पर्धा होती तर धोपावकर यांचीही चौथी मॅरेथॉन होती. ते अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव अंध धावपटू ठरले.

धोपावकर यांनी धनेश खत्ती व डॉ. मिलिंद कांबळे या मित्रांच्या सहकार्याने १० किलोमीटरचे अंतर ७८ मिनिटांत पूर्ण करत सहभागींचे लक्ष वेधले.  या बद्दल दोन्ही अंध धावपटूंचा आयोजकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

मॅरेथॉनचे विजेते-
२१ किलोमीटर –
व्हेटरन पुरुष – 
प्रथम – नीम थापा
द्वितीय – बाळकृष्ण जगताप
तृतीय – सारंग देशपांडे

सर्वसाधारण पुरुष – 
प्रथम – राज तिवारी
द्वितीय – हिटमन लेटी
तृतीय – पवन जाधव

१० किलोमीटर –
व्हेटरन पुरुष – 
प्रथम – महादेव घुगे
द्वितीय – महेश मुळे
तृतीय – जनार्धन गिते

सर्वसाधारण पुरुष – 
प्रथम – दीपचंद भारती
द्वितीय – योगेश निमसे
तृतीय – रामभवन पाल

सर्वसाधारण महिला – 
प्रथम – विशाखा भास्कर
द्वितीय – चैताली गांधी
तृतीय – मोनाली फिरोदिया

Tags

follow us