अहमदनगरः दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji kardile) यांचे समर्थक आणि शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते (Dilip Satpute) यांचे समर्थक आमने-सामने आले होते. त्यातून दगडफेक झाली असून, परस्परांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आता दिलीप सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्डिले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दडपशाही करणे, दादागिरी करणे, असे आरोप सातपुते यांनी कर्डिले यांच्यावर केला आहे.
साईभक्तांसाठी आनंदाची बातमी : शिर्डीत रात्रीचेही विमान उडणार
माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय, शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार सातपुते यांच्यासह काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. सातपुते म्हणाले, अहमदनगर शहरामध्ये विविध प्रश्नावर जे आवाज उठवितात. त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करणे, दडपशाही करणे, दादागिरी करणे, त्यांना धक्काबुक्की करणे असे प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहेत, असा आरोप सातपुते यांनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वी नगर तालुक्यात एका लग्नात झालेल्या घटनेवर सातपुते म्हणाले, नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात आमच्या पक्षातील युवा नेत्याचा तालुक्यातील एका नेत्याला चुकून धक्का लागला. त्यामुळे त्यांनी दगडफेक केली. त्यावर आमच्या कार्यकर्त्यांनी प्रतिउत्तर दिले. कोणी दादागिरी व गुंडगिरी करून सर्व जमेल असे कोणी समजण्याचे कारण नाही. असे प्रकार पुन्हा घडले तर त्याला तीव्र उत्तर दिले जातील, असा इशाराही सातपुते यांनी दिला आहे.