अहमदनगर : आजकाल सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहून सायबर भामटेही यावर सक्रीय झालेत. अनेकांचे फेसबुक प्रोफाईल हॅक करून त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील मित्रांकडून पैस मागण्याचे सर्रास घडतांना दिसतात. जनतेचे संरक्षक असलेले पोलिसही या हॅकिंगपासून (Hacking) वाचू शकले नाही. आता नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला (Rakesh Ola) यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला.
महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या हॅकिंगला आणि फेसबुक क्लोनिंगला सर्वसामान्य माणसांसह मोठमोठे अधिकारीही बळी पडत आहेत. यापूर्वी अहमदनगर शहरात मोठ्या अधिकाऱ्यांचे फेसबुक आणि व्हाट्सअप हॅक होण्याचे प्रकार घडले आहे. यामध्ये प्रामुख्याने पहिले तर महानगरपालिकेचे आयुक्त तसेच पोलीस प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले होते.
धक्कादायक बाब म्हणजे हॅकर अकाऊंट हॅक करून त्यावरून पैसे मागतात. असे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले होते. मात्र आता या सायबर हॅकरने थेट नगर जिल्ह्यात गुन्हेगांवर दणक्यात कारवाई करणारे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे फेसबुक अकाउंट हॅक केलं. त्यामुळं सध्या हा विषय चर्चेत आहे.
पोलीस अधीक्षकांनी केले महत्वाचे आवाहन
फेसबुक अकाउंट हॅक झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत सोशल मीडियावर या प्रकारची माहिती दिली आहे. तसेच यावरून आलेले कोणतेही संदेश गृहीत धरू नये असेही आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, सर्वसामान्य लोकांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्यानंतर त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फेसबुक अकाउंट हॅक होणे सुरू झाल्याने सायबर क्राईम मधील हे अज्ञात चोरटे कोणालाच सोडत नाहीत, हेच या गोष्टीवरून समोर आले आहे.