Download App

पाटील-कदम जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात.. सांगलीतील सत्काराआधीच ‘रोडमॅप’ क्लिअर

सांगलीतील कसबे डिग्रज येथील सत्कार समारंभात खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी जयंत पाटलांना इशारा दिला.

Sangli Lok Sabha Election : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघ गाजला (Sangli Lok Sabha) तो इथल्या कुरघोड्यांनी. मतदारसंघावर दावेदारी पक्की असतानाही विशाल पाटलांना डावलण्यात आलं. लाख प्रयत्न करुनही काँग्रेसला हा मतदारसंघ आपल्याकडे घेता आला नाही. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना तिकीट दिलं. मग विशाल पाटलांनीही शड्डू ठोकत अपक्ष उडी घेतली आणि निवडणूक जिंकली. या झाल्या काही ठळक अन् समोरील घडामोडी. पडद्यामागेही बरंच राजकारण शिजलं. विशाल पाटलांना काँग्रेस नेत्यांनी आतून रसद पुरवली. जयंत पाटील यांच्यामुळेच विशाल पाटलांचं तिकीट नाकारलं गेलं अशा चर्चा होत्या. या चर्चांना विशाल पाटील यांनी एका मुलाखतीत दुजोरा दिला होता. आता निवडणूक झाल्यानंतर विशाल पाटील यांनी थेट इस्लामपूर गाठत जयंत पाटलांना ललकारलं आहे.

इस्लामपूर येथील कसबे डिग्रजमध्ये आयोजित केलेल्या सत्कार समारंभातून विशाल पाटील आणि विश्वजीत कदम या दोघांनीही जयंत पाटील यांना सूचक शब्दांत इशारा दिला. इस्लामपूर-वाळवा मतदारसंघावर आपलं विशेष लक्ष राहिल. येथे काही नवे निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा देण्यात आला. कसबे डिग्रजमधील जनतेच्या पाठिशी आम्ही आहोत. याआधी आमचं येथे जास्त लक्ष नव्हतं आगामी काळात मात्र दहापट जास्त लक्ष देऊ असे विश्वजीत कदम म्हणाले.

Sangli Loksabha : सांगलीत आम्हीच किंग! विशाल पाटलांनी सिद्ध करुन दाखवलंच

सांगलीत सत्कार होण्याआधीच आम्ही इस्लामपुरात आलो आहोत. यावरून लक्षात आलं पाहिजे की पुढील दिशा काय राहणार आहे. आम्ही कुचकं राजकारण करत नाही. सरळ काय तो निर्णय घेत असतो. हे तुम्हाला पुढील दिवसांत पाहायला मिळेलच. या ठिकाण नव्या ताकदीनं नवे निर्णय घ्यावे लागणार आहेत. कुणाच्या तरी दबावाखाली राहण्याचे दिवस आता गेले आहेत, असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी आपल्या भाषणातून दिला.

कदम-पाटलांचं बाँडिंग बिघडलं

सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची नुकतीच एक मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीत उमेदवारी जाहीर होण्याआधी जयंत पाटीलच चंद्रहार पाटलांना मातोश्रीवर घेऊन गेले होते का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर विशाल पाटील म्हणाले, तशा चर्चा होत्या हे खरं आहे.

वृत्तवाहिन्यांवर आम्ही बऱ्याच चर्चा ऐकत होतो की चाळीस आमदार उद्धव ठाकरेंना सोडून का गेले. या आमदारांना जर विचारलं की ते सांगायचे उद्धव ठाकरेंची भेटच होत नव्हती. संपर्क होत नव्हता. मग असं असेल तर एखादा व्यक्ती मुंबईत पोहोचतो. उद्धव ठाकरेंना भेटतो. उमेदवारीही जाहीर करुन घेतो. एवढ्यापर्यंत पोहोचतो. आमदारांना भेट मिळत नाही पण पैलवान मात्र भेटून आले. संशय येणं सहाजिकच आहे. त्यामुळे त्या काळात ज्या चर्चा होत्या त्या काही चुकीच्या नव्हत्या. ते कोणत्या कारणासाठी भेटले हे मला माहिती नाही पण भेट झाली असावी असा दावा विशाल पाटील यांनी केला.

लोकसभेनंतर सांगलीत विधानसभेतही रस्साखेच; जयंत पाटील विश्वजीत कदम पुन्हा आमने-सामने

त्यांच्या या वक्तव्यावर विश्वजीत कदम मात्र सारवासारव करताना दिसून आले. विशाल पाटलांनी जरा हे आवश्यक होतं आणि अनावश्यक होतं असं काहीतरी बोलले आहेत आत्ता. माझं आतापर्यंत पूर्ण मौन होतं असे विश्वजीत कदम म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही नेत्यांतलं बाँडिंग बिघडलं का अशा चर्चा आाता सुरू झाल्या आहेत.

follow us