अहमदनगर : शनि अमावस्येनिमित्त जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान शनी शिंगणापूर येथे राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. नव्या वर्षातील पहिलीच शनि अमावस्या यात्रा असल्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली होती. ओडिशाच्या शनिभक्ताने तब्बल १ कोटींचा सोन्याचा एक किलोहून अधिक वजनाचा तेलकलश शनिचरणी अर्पणकेला आहे.
गेली दोन वर्षे कोरोनाने देशभरात धुमाकूळ घातला होता. यामुळे खबरदारीची भूमिका घेत राज्यातील धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने धार्मिक स्थळे खुली करण्यात आली. दरम्यान नवीन वर्षाच्या सुरुवातीची शनी अमावस्या असल्याने भाविकांनी यावेळी मोठी गर्दी केली. शनि अमावस्या निमित्त शनिशिंगणापूरला दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे.
ओडिशातील एका भक्ताने शनिशिंगणापूरच्या शनिदेवतेला एक कोटी रुपयांचा सोन्याचा कलश अर्पण केला आहे. हा कलश कोणत्या मंत्र्याने अर्पण केला? हे कळू शकले नाही. या मंत्र्याने आपलं नाव गुपित ठेवण्याची विनंती करून हा कलश दान दिला आहे.
एक किलो सातशे ग्रॅम सोने आणि पाच किलो चांदीतून हा कलश तयार करण्यात आला आहे. शनी अमावास्येनिमित्त सायंकाळी झालेल्या आरती सोहळय़ानंतर हा कलश शनी मूर्तीसमोर विधिपूर्वक अर्पण करण्यात आला.
शनी अमावस्या असल्याने भाविकांनी शनिवारी संध्याकाळपर्यंत सात ते आठ लाख भाविकांनी शनिदेवतेचे दर्शन घेतले. शनिशिंगणापूर येथील प्रसिद्ध असलेला बर्फीचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान, देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली.