Download App

मोहिते पाटील अन् रामराजेंची घरवापसी होणार? जानकरांनाही सोबत घेणार? माढ्याचा डाव पवारांच्याच हातात!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा बारामती एवढाच दुसरा हक्काचा मतदारसंघ म्हणजे माढा. 2009 मध्ये पंढरपूर मतदारसंघ जाऊन माढा मतदारसंघ तयार झाला. पहिल्याच निवडणुकीत स्वतः पवारांनीच मैदानात उडी घेतली. त्यानंतर 2014 मध्ये पवारांनी अत्यंत विश्वासू अशा विजयसिंह मोहिते पाटील यांना लोकसभेत पाठविले. 2019 मध्ये राजकीय समीकरणे बदलली, मोहिते पाटील घराण्याने भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे पवारांनी संजयमामा शिंदे यांना मैदानात उतरविले. त्यांनी त्यावेळी कडवी झुंज दिली होती. पण भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी शिंदेंचा 85 हजार मतांनी पराभव केला. (Sharad Pawar has many options available as a candidate for Madha Lok Sabha constituency.)

आता मागच्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात अनेक अनपेक्षित स्थित्यंतरे झाली आहेत. पण त्यानंतरही माढा लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत पवार यांच्याच वाट्याला आली आहे. भाजपने या मतदारसंघातून अनेकांचा विरोध असूनही पुन्हा एकदा रणजीतसिंह नाईक निंबाळकरांच्याच गळात उमेदवारीची माळ टाकली आहे. मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदारही अजितदादांच्या साथीने महायुतीच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यामुळे पवारांकडे आता तगडा उमेदवार नसल्याचे बोलले जात आहे. पण चर्चांना बगल देऊन पवारांनी माढ्यातील डाव अद्याप आपल्याच भोवती फिरता ठेवला आहे. पवारांकडे यंदा माढ्यात अनेक पर्याय असल्याचे दिसून येत आहे. यात भाजपमधील नाराज मोहिते पाटील यांच्यापासून ते अभयसिंह जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

नेमकी कोण आहेत ही नावे? पाहुया सविस्तर…

सगळ्यात पहिले नाव महादेव जानकर :

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे शरद पवार यांच्याशी मागील काही दिवसांपासून वाटाघाटीच्या चर्चा करत आहेत. मतदारसंघातील धनगर आणि इतर बहुजन समाजाची मते विचारात घेता शरद पवार यांनी फासे टाकले आहेत. जानकरांच्या येण्याने बारामतीत सुप्रिया सुळेंनाही फायदा होईल, असे गणित शरद पवारांनी मांडले आहे. त्यातूनच त्यांनी जानकर आमच्यासोबत आले तर त्यांना माढ्याची जागा सोडू असे सांगितले होते. तेव्हापासूनच माढ्यातून जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे बोलले जात होते.

मोहिते पाटील घराणे पवारांकडे परतणार?

गत निवडणुकीत मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला समजाला जाणाऱ्या माळशिरसमधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाखाचे लीड मिळाले होते. हेच लीड त्यांच्या विजयात महत्वाचे ठरले होते. पण यंदा मात्र मोहिते पाटील घराण्याने रणजितसिंहांच्या उमेदवारीला उघड विरोध करून माढ्यावर दावा सांगितला होता. धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघ पिंजायलाही सुरुवात केली होती. पण भाजपने मोहिते पाटील यांच्या या विरोधाला डावलून रणजितसिंहानाच उमेदवारी दिली आहे. त्यानंतर मतदारसंघात धैर्यशिल मोहित पाटील यांनी बंडखोरी करुन अपक्ष उभे रहावे किंवा तुतारीच्या चिन्हावर उभे रहावे अशी मोहिते पाटील समर्थकांची मागणी सुरु आहे. तेव्हापासून मोहिते पाटील घराणे पुन्हा राष्ट्रवादीमथ्ये परतणार अशी चर्चा सुरु आहे.

New EV Policy : भारतात टेस्लाची एन्ट्री फिक्स; मोदी सरकारनं जाहीर केली नवी EV पॉलिसी

रामराजे पुन्हा शरद पवारांकडे परतणार?

रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात विळ्या-भोपळ्याचे वैर आहे. दोघांचे अर्धा टक्काही जमत नाही. रणजीतसिंह आधी काँग्रेसमध्ये होते, तर रामराजे राष्ट्रवादीमध्ये. मात्र दोघांमधून विस्तवही जात नव्हता. रणजीतसिंह निंबाळकर यांच्या तीन पिढ्या माझ्यावर आरोप करत आल्या आहेत. रणजीतसिंहांनी मला खूप त्रास दिला आहे, असे आरोप रामराजे जाहिररित्या आजही करतात. यातूनच रामराजे यांनी जाहीर मेळाव्यात तुला तिकीट मिळू देत नाही, असे म्हटले होते. तसेच त्यांनी त्यांचे बंधू संजीवराजेंसाठी आरपारचा जोर लावला होता. माढ्याची जागा मिळाली नाही तर कार्यकर्ते ऐकणार नाहीत अशीही भूमिका मांडली होती.

पण आता रणजीतसिंहांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर समर्थक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. सोशल मीडियावर उलटसुलट पोस्ट व्हायरल होवू लागल्या आहेत. यातून रामराजे नाईक निंबाळकर हे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करणार नाहीत, हे तर स्पष्ट होत आहे. अशात पवार यांच्याकडून संजीवराजेंच्या उमेदवारीचा शब्द मिळाला तर निलेश लंके यांच्याप्रमाणेच रामराजेही पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतू शकतात, अशी मतदारसंघात चर्चा सुरु आहे. रामराजे यांनी पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला तर या निवडणुकीत चांगलाच ट्विस्ट येऊ शकतो.

अभयसिंह जगताप :

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून माणमधील अभयसिंह जगताप यांनी गेल्या काही महिन्यांपासून रान उठवले आहे. काही दिवसांपूर्वी टेंभुर्णी येथील मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले होते. अभियसिंह जगताप हे सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील म्हसवडचे रहिवासी आहेत. संगणक अभियंता असलेल्या जगताप यांची पुण्यात कंपनी आहे. शरद पवार यांच्या गटात ते मागील पाच ते सहा वर्षापासून सक्रियपणे काम करत आहेत. त्यांचे माण तालुक्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे काम आहे. कोरोना काळात त्यांनी कोविड हॉस्पिटलची उभारणी करून शेकडो लोकांचे जीव वाचवले आहेत. जगताप यांनी माढा लोकसभा मतदारसंघात दौरेही सुरू केले आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याचे मेळावे, महिला मेळावा घेतले आहेत. त्यामुळेच जगताप यांच्यारुपानेही पवार यांच्याकडे चांगला पर्याय असल्याचे बोलले जाते.

दिल्ली दारू घोटाळ्याचे ‘हैदराबाद’ कनेक्शन; माजी CM केसीआर यांच्या मुलीच्या घरी ‘ईडी’चे छापे

प्रभाकर देशमुख किंवा  डॉ. बाबासाहेब देशमुख :

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माणमधील नेते आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हेही आदेश आला तर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे समजत आहे. त्यांनी 2019 मध्ये माण-खटाव मतदारसंघातून भाजपच्या जयकुमार गोरे यांच्याविरोधात निवडणूकही लढवली होती. त्यावेळी त्यांना जवळपास 88 हजार मते मिळवली होती. याशिवाय शेतकरी कामगार पक्षानेही माढ्यावर दावा सांगितला आहे. दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचेच नातू इच्छुक असल्याने शरद पवारांकडे आणखी एक पर्याय असल्याचे बोलले जात आहे.

एकूणच राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर शरद पवार यांच्याकडे बरीच आयुधे शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. आता याचा पर्यायांचा आणि सोशल इंजिनिअरिंग प्रयोगाचा अभ्यास करुन शरद पवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात माढ्यात कोणाला उमेदवारी देतात, यावर माढा लोकसभा मतदारसंघाची गणिते अवलंबून असणार आहेत.

follow us