कोल्हापूर : राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार केला असून, आज (दि. 25) पवारांची स्वाभिमानी निर्धार सभा कोल्हापूरमध्ये होत आहे. बीड नंतर कोल्हापुरात शरद पवार यांना तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळताना पाहण्यास मिळत असून, पुरोगामी कोल्हापुरात शरद पवार नेमकी काय भूमिका मांडणार तसेच त्यांच्या निशाण्यावर कोण असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोल्हापुरातील सभेचे लाईव्ह अपडेट देणारा लाईव्ह ब्लॉग…
लोक महागाई बेकारीने त्रासले आहे. कष्ट करणाऱ्यांची ताकद नव्या पिढीला आहे. बेकारीचे संकट ठिकठिकाणी बघायला मिळाले आहे. शेतीची अवस्था आहे. शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत, शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
शाहू महाराजांचा समतेचा विचार महाराष्ट्राने मान्य केलाय. पण कधीमधी तो विसरला जातोय, छत्रपती शाहू महाराजांची खंत
आमचे सहकारी हे ईडीच्या धाकाने सोडून गेले आहे. ईडीची भिती मला होती. ईडीचा धाक मला दाखविला आहे. जीवनभर जेलमध्ये जाईल पण तुमच्याशी समझौता करणार नाही, असे मी सांगितल्याचे अनिल देशमुख यांनी कोल्हापुरात सभेत सांगितले आहे.
कुस्ती त्यांच्याशी आहे. आमच्याशी नाही, आमचा वस्ताद लई भयंकर आहे. ते स्वतःच सांगतात येता का कुस्ती खेळायला आहे. त्यामुळे समोरच्यांची पातळ होते, जितेंद्र आव्हाडांचा जोरदार टोला
बंडखोरीनंतर हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज त्यांच्या शहरात म्हणजेच कोल्हापुरात पवारांची जाहीर सभा होत आहे. पवारांच्या सभेपूर्वी हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या व्यक्त करताना मुश्रीफ भावूक झाले. ते म्हणाले की, 40 वर्षानंतर प्रथमच कोल्हापुरात शरद पवार येऊनदेखील आमची भेट होणार नाही. परिस्थितीप्रमाणे आम्ही निर्णय घेतलेला आहे. का निर्णय घ्यावा लागला याचे विवेचनही आम्ही केलेले आहे. आज ते येत आहेत मात्र मी त्यांच्यासोबत नाही याचे दुःख मनात असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
सभेला सुरूवात होण्यापूर्वी मोदी सरकारवर सध्याच्या देशातील एकूण परिस्थीवर पोवाडा आणि गाण्याच्या माध्यामातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यात प्रामुख्याने काळा पैसा, जातीय वाद आदींसह अनेक विषयांवर भाष्य करत हल्लाबोल करण्यात आला.
कोल्हापुरातील सभेसाठी राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अनिल देशमुख, रोहित पवार, शशिकांत शिंदे, फौजीया खान, आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्यासह इतर मान्यवर मंचावर उपस्थित आहेत. आजच्या सभेसाठी छत्रपती शाहु महाराज हे अध्यक्षस्थानी आहेत. ते या मंचावरून काय बोलतात याकडे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.