Download App

भारताविरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांना शिवेसेनेच्या युवा नेत्याने भर कोर्टात चोपले

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर (Bhuikot Fort) भारतविरोधी घोषणा देणाऱ्या तरुणांना शिवसेनेच्या शिंदे गटाच्या युवा पदाधिकाऱ्याने कोर्टात चोप दिला. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली. अचानक घडलेल्या या घटनेने न्यायालयात एकच गोंधळ उडाला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेच्या शिंदे गटाचे युवा संघटक अमोल हुंबे (Amol Humbe) याला भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अमोल हुंबे हा शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या युवा सेनाचा संघटक म्हणून पदाधिकारी आहे. काही तरुणांनी भारतविरोधी घोषणाबाजी केल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे अहमदनगर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप पसरला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी काही तरुणांना अटक केल्याची माहिती समर आली. तसे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले. या तरुणांना भिंगार कॅम्प पोलीस जिल्हा न्यायालयात हजर करणार होते. या तरुणांना न्यायालयात कधी हजर करणार, याची माहिती अमोल हुंबे याने घेतली.

यानंतर अमोल हुंबे याने थेट न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, भिंगार कॅम्प पोलिसांनी या  तरुणांना न्यायालयात हजर केले. न्यायालयासमोर सुनावणी सुरू झाली. त्यावेळी अमोल हुंबे हा न्यायालयासमोर गेला. त्याने हात जोडून सर्वप्रथम न्यायालयाची माफी मागितली. यानंतर अमोलने तरुणांकडे धाव घेत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने अचानक केलेल्या या कृतीमुळं कोर्टात गोंधळ उडाला. दरम्यान, पोलीसांनी प्रसंगावधान दाखवत अमोल याला ताब्यात घेतले. या गोंधळामुळे न्यायालयाचे कामकाज काही काळ ठप्प झाले होते.

माणसं मेली तरी सत्तेला चिकटून बसण्याची भाजपची प्रवृत्ती, पटोलेंचा घणाघात 

न्यायालयाने अमोल याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना भिंगार कॅम्प पोलिसांना दिल्या आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या युवा संघटक अमोल हुंबे याने केलेल्या कृतीची माहिती अहमदनगर शहरात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनीही भिंगार कॅम्प पोलिस ठाणे गाठले.

यावेळी दिलीप सातपुते म्हणाले, भारतविरोधी वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कायदेशीर लढा सुरूच राहणार आहे. पण आता त्यांना समजून घेण्यासाठी ठोशाची भाषा वापरावी लागणार आहे. जो कोणी भारतविरोधी असेल आणि महापुरुषांचा अपमान करेल, त्याला शिवसेना कार्यकर्ते असाच धडा शिकवतील, असा इशाराही दिलीप सातपुते यांनी दिला आहे.

दरम्यान, ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनी सय्यद तौकीर आरिफ तौकीर (रा. पंचपीर चावडी, पाटेकर गली, माळीवाडा, अहमदनगर), परवेज इजाज पटेल (रा. अमिना मस्जिदजवळ, आलमगीर), मकसूद वसीम शेख (रा. बडी मस्जिद, मुकुंदनगर, अहमदनगर) साद साजिद तांबोळी (रा. जुना बाजार रोड, पटवेकर गली, माळीवाडा, अहमदनगर) आणि अरबाज उर्फ बंबई शेख (रा. कोठला अहमदनगर) या पाच जणांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्म्ड बेसिक ट्रेनिंग रेजिमेंटचे कॉन्स्टेबल प्रशांत कुमार श्री चंदेश्वर सिंह यांनी फिर्याद दिली होती.

Tags

follow us