Download App

Satyajit Tambe: शुभांगी पाटलांच्या पाठिशी ‘नगरची अज्ञात शक्ती’, काँग्रेस नेत्याच्या दाव्याने खळबळ

अहमदनगर : विधान परिषदेच्या (Legislative Council) नाशिक पदवीधर मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहचला असतानाच रोज नवीन ट्वीस्ट येतोय. शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या पाठीशी नगर जिल्ह्यात अज्ञात शक्ती आहे. त्यामुळे पाटील यांचा विजय निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेत्याने केलाय.

अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांचा बालेकिल्ला असलेल्या अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात महाविकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या उमेदवार शुभांगी पाटील प्रचारसाठी आल्या होत्या. यावेळी प्रचार सभेत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे.

देशमुख म्हणाले की, ‘शुभांगी पाटील यांच्या पाठीशी नगर जिल्ह्यात अज्ञात शक्ती आहे. त्यामुळे पाटील यांचा विजय निश्चित आहे.’ आता ही अज्ञात शक्ती कोण? यावरून आता जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील शनिवारी अहमदनगर येथे प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी आयोजित बैठकीत देशमुख बोलत होते.

देशमुख म्हणाले, ‘जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते व्यक्ती पूजेपेक्षा विचारधारेला व पक्षाच्या आदेशाला महत्त्व देतात. याशिवाय नगर जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत अज्ञात शक्ती कार्यरत असते.

या शक्ती निवडणूक निकालाला दिशा देतात. त्यामुळे नगर जिल्ह्यातून शुभांगी पाटील यांना निश्चितच आघाडी मिळेल.’

देशमुख यांच्या वक्तव्याचे आता वेगवेगळे अर्थ लावले जाऊ लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची सर्वपक्षीय यंत्रणा नेहमीच चर्चेत असते. ही पूर्वीपासूनच यंत्रणा असल्याचे मानले जाते.

विखे पाटील कोणत्याही पक्षात असले तरी ही सर्वपक्षीय यंत्रणा विखे पाटील यांना हवी असलेली कामगिरी करते, अशी चर्चा प्रत्येक निवडणुकीच्या वेळी होत असते.

सध्याच्या निवडणुकीतही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेकडे जसे लक्ष लागले आहे, तसेच त्यांचा राजकीय प्रतिस्पर्धी विखे पाटील यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.

शिवाय काही दिवसांपूर्वी विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिर्डी विमानतळावर गुप्त चर्चा झाली होती.

विखे आणि भाजपची उघड भूमिका अद्याप जाहीर झालेली नसताना देशमुख यांनी नगर जिल्ह्यातील अज्ञात शक्ती असा उल्लेख केल्याने ही शक्ती नेमकी कोणती? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Tags

follow us