मी लय भोळा दिसत असेल…पण तसा नाय; घरावर झालेल्या हल्ल्यानंतर बाबासाहेब देशमुख आक्रमक
माझ्यावर जबाबदारी असल्याने मी संयम राखतो, नाहीतर एक-दोघांना माझा दणका माहित हायं, अशा शब्दांत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांनी सुनावलं.

‘दादांनो, मी लय भोळा दिसत असेल…पण मी तसा नाय. (Solapur) एक-दोघांना माझा दणका माहिती हाय’हे शब्द होते शांत आणि संयमी म्हणून परिचित असलेले आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे. भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी सांगोल्याचे माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकून हल्ला करण्यात आला. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोल्यात आज (ता. 11 ऑक्टोबर) सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चात देशमुख आक्रमक झाले होते.
सांगोल्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे आपले दुकाने बंद ठेवली होती. मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना संयमी, शांत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा रुद्रावतार पहायला मिळाला. त्यामुळे उपस्थितही काही वेळ अवाक् झाल्याचे दिसून आले. दादांनो, मी लय भोळा दिसत असेल…पण तसा नाय. दादा (डॉ. अनिकेत देशमुख) आक्रमक हायं, पण मी त्याच्यापेक्षा जास्त आक्रमक हायं.
घायवळ गँगने ज्याला संपवायचा प्रयत्न केला त्याच्यावर मोक्का; वाचा नक्की काय घडलं?
माझ्यावर जबाबदारी असल्याने मी संयम राखतो, नाहीतर एक-दोघांना माझा दणका माहित हायं, अशा शब्दांत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांनी थेट प्रतिस्पर्ध्यांना लक्ष्य केले. आमदाराच्या या आक्रमक स्वभावाला उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला. मोर्चादरम्यान एका वक्त्याने डॉ. बाबासाहेब देशमुख आणि त्यांचे चुलत बंधू डॉ. अनिकेत देशमुख यांनी एकत्र राहावे, अशी टिपण्णी केल्यावर आमदारांनी ती थेट उचलली.
हे राजकारण आहे. आबासाहेबांचं (स्व. गणपतराव देशमुख) बाळकडू आम्हाला मिळालंय. कुठं एकत्र बसायचं, कुठं दूर राहायचं, हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आम्हा दोघा बंधूंमध्ये केसाएवढंही अंतर नाही. जनतेने समजून घ्यावं, हे राजकारण आहे. आमदार देशमुख यांच्या या विधानाने ‘देशमुख विरुद्ध देशमुख’ अशी चालणाऱ्या चर्चेवरही एका क्षणात पडदा टाकला आहे.