राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीनंतर आरोपांची सरबत्ती; रोहित पवारांचा धनंजय मुंडेंवर थेट निशाणा
आमदार धनंजय मुंडे आणि आमदार रोहित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली असून, दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक रंगली आहे
Rohit Pawar’s direct target on Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. बैठकीतून झालेल्या वक्तव्यांनंतर आमदार धनंजय मुंडे आणि आमदार रोहित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली असून, दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक रंगली आहे. मुंबईतील वरळी डोम येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीला प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवाळ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
मुंडेंचा अप्रत्यक्ष हल्लाबोल
बैठकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटावर नाव न घेता टीका केली. दादांच्या अकाली निधनानंतर सर्वांनी एकमताने सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. माझी मध्यंतरी वाचा गेली होती; तशीच कायमची गेली असती तर बरे झाले असते, कारण दादांबद्दल शोक व्यक्त करण्याची वेळ आली नसती, असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.
याचवेळी त्यांनी शपथविधीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवरही निशाणा साधला. वहिनींना शपथविधीची घाई झाली होती, आम्ही दबाव टाकत होतो असे म्हणणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. अजित दादांना अग्नी देण्याआधी विलिनीकरणाची भाषा कोणी केली? सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर साधे शुभेच्छांचे ट्विटही का केले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
थोडं सांभाळून वागा, आमदार रोहित पवारांचा ‘या’ चार नेत्यांना इशारा
रोहित पवारांचा थेट आरोप
या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवारांनी थेट भूमिका मांडली. हे चार नेते फक्त राजकारण करत आहेत. तुम्ही सत्तेत आहात; मग मी जो लढा देतोय, तो तुम्ही द्यायला हवा. आम्हाला गुन्हा दाखल करण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे, असे ते म्हणाले. नरहरी झिरवाळ यांच्या संदर्भात गंभीर आरोप करताना रोहित पवार म्हणाले, नरहरी झिरवाळ यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणले जात आहे. त्यांना बाजूला करून महाराष्ट्राला नको असलेल्या व्यक्तीला मंत्रिपद द्यायचे आहे. त्यासाठी पक्षातूनच झिरवाळांना लक्ष्य केले जात आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
‘एफआयआर स्टंट’चा आरोप
धनंजय मुंडे यांनी रोहित पवारांवर प्रतिआरोप करताना एफआयआरसाठी स्टंट केल्याचा आरोप केला. काल एफआयआर घेतला नाही म्हणून स्टंट केला, आज बारामतीत एफआयआरसाठी स्टंट केला. हे सगळे आमच्या बैठकीची न्यूज किल करण्यासाठी होते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे किळसवाणे वाटते, असे ते म्हणाले.
राजकीय संघर्ष तीव्र
राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा, मंत्रिपदाच्या शक्यता आणि एफआयआरच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले असून, पुढील काही दिवसांत या वादाला आणखी धार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
